नाशिक – काश्मीर ते कन्याकुमारी जोडणारे नाशिक हे देशाचे मध्यवर्ती स्थान आहे. नाशिकची काही बलस्थाने पाहता या ठिकाणी भाजी, फळे, औषधे साठविण्यासाठी शीतगृहाची गरज आहे. जेणेकरुन माल खराब होण्याचे प्रमाण कमी होऊन वाहतूक करणे सोपे होईल. ज्यामुळे वाहतूकीचा खर्च कमी होईल. इंधन बचत होईल. देशातील मध्यवर्ती स्थान पाहता भविष्यात नाशिक देशाचे रसद केंद्र (लॉजेस्टिक कॅपिटल) होण्यासाठी वाहतूकदार संघटनेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच भाजपला आजचे यश – गोपीनाथ गड लोकार्पणप्रसंगी नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

नाशिक जिल्हा वाहतूकदार संघटनेच्या वतीने येथे ऑल व्हील डिस्प्ले संकल्पनेतून शहरात मे महिन्यात ऑटो अँड लॉजेस्टिक एक्स्पो भरविण्यात येणार आहे. या अनुषंगाने शनिवारी ‘ऑटो अँड लॉजीस्टिक समिट’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना गडकरी यांनी इंधन म्हणून डिझेलचा पर्याय सर्वात महागडा व प्रदूषणकारी असून त्याऐवजी एलपीजी, सीएनजीचा स्वस्त व प्रदूषण विरहीत पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले. भविष्यात हायड्रोजनवर चालणाऱ्या मालमोटारी तयार केल्या जातील. इंधन म्हणून जैवडिझेल, मिथेनाॅल हे पर्याय देखील उपलब्ध आहेत. जैविक इंधन तयार करण्यासाठी शेतकर्यांना मोठी संधी आहे. आपण स्वत: ट्रॅक्टरसाठी जैविक इंधन वापरुन वर्षाला एक लाखाची बचत केल्याचे उदाहरण गडकरी यांनी यावेळी दिले. भविष्यात रसद क्षेत्रात मोठे परिवर्तन घडणार असून त्यासाठी वाहतूकदार क्षेत्राने तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. नाशिक शहरात होणारी वाहनांची गर्दी व प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने शहराबाहेर वाहतूक नगर उभारावे. द्वारका चौकातील कोंडी सोडविण्यासाठी आता दुमजली पूल बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> नाशिक संरक्षण केंद्र होण्यासाठी प्रयत्न करणार – नितीन गडकरी यांचे आश्वासन, आपल्या सैन्याला ओळखा प्रदर्शनाचे उदघाटन

यावेळी गडकरी यांच्या हस्ते एक्स्पोच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ‘सारथी सुविधा केंद्र’ या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास महापालिका आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, नाशिक जिल्हा वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड, कार्यकारी अध्यक्ष पी. एम. सैनी, सचिव शंकर धनावडे, सेवा ऑटोमोबाईलचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाफना, जितेंद्र ऑटोमोबाईल्सचे जितेंद्र शाह आदी उपस्थित होते.

यावेळी एक्स्पो उपक्रमांअंतर्गत मविप्र केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यटन विकासाचा सर्वांगीण दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित सादरीकरण आणि भित्तीपत्रक स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transporters association should take initiative to make nashik logistics capital says nitin gadkari zws