नाशिक – जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात ४९२२ केंद्रांवर बुधवारी सकाळी सुरू झालेल्या मतदानात ११ वाजेपर्यंत नऊ लाख ५२ हजार ४७५ म्हणजे १८.८२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदारांमध्ये अधिक उत्साह दिसत आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे १३.९० टक्के मतदान झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळी सात ते ११ या वेळेत नाशिक जिल्ह्यातील पाच लाख ३३ हजार ९० पुरुष तर चार लाख १९ हजार ३८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी अधिक असल्याचे दिसून येते. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २६.४१ टक्के मतदान दिंडोरी मतदारसंघात झाले. त्या खालोखाल मालेगाव मध्य मतदारसंघात (२२.७६ टक्के), चांदवड (२१.३०), सिन्नर (२१.२०), येवला (२०.९२), इगतपुरी (२०.४३), नाशिक मध्य (१८.४२), कळवण (१८.२४) बागलाण (१८.२३), निफाड (१७.६४), मालेगाव बाह्य (१७.३७), नांदगाव (१६.४६), नाशिक पश्चिम (१६.३२), देवळाली (१५.०१) आणि नाशिक पूर्व मतदारसंघात १३.९० टक्के मतदान झाले. शहरात काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. ग्रामीणमध्येही फारसे वेगळे चित्र नाही. सर्व मतदारसंघातील आकडेवारी पाहिल्यानंतर शहरी मतदारसंघापेक्षा ग्रामीण भागातील मतदारसंघात अधिक मतदान झाल्याचे दिसून येते.

हेही वाचा – बाहेरून मतदार आणल्याने कांदे-भुजबळ समर्थकांमध्ये धक्काबुक्की , सुहास कांदे यांच्याकडून समीर भुजबळांना जिवे मारण्याची धमकी

हेही वाचा – जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला

यंदा प्रशासनसह स्वयंसेवी संस्थांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढाकार घेतला. लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात ६४.२१ टक्के मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक नेण्यासाठी उत्साहात मतदान करावे, असे आवाहन नाशिक जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे. लोकसभेवेळी शहरापेक्षा ग्रामीण भागात भरभरून मतदान झाले होते. यावेळी शहरात मतदानाचे प्रमाण निश्चितपणे वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voter enthusiasm is more in rural areas compared to nashik city ssb