नवी मुंबई : प्रियकराला वश करून देण्यासाठी एका युवतीकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भोंदू बाबाला अखेर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. या गुन्ह््याची उकल करणे कठीण असताना खबरी आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने अशाच प्रकारने अनेकांना फसवले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
वासिम रइस खान ऊर्फ बाबा कबिर खान बंगाली असे अटक आरोपीचे नाव आहे. खारघर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय युवतीचे सहा महिन्यांपूर्वी प्रियकराचे वाद झाल्याने त्यांच्यातील संपर्क तुटला होता. मात्र ती अस्वस्थ होती. प्रियकर प्रतिसाद देत नसल्याने तिला नैराश्य आले होते. दरम्यान लोकलमधून प्रवास करताना भोंदू बाबची जाहिरात वाचून तिने संपर्क केला. आरोपीने तिला विश्वास दिल्यानंतर चार महिन्यांत एकूण ४ लाख ५७ हजार रुपये आरोपीने उकळले. विशेष म्हणजे ही युवती उच्चशिक्षित होती तर आरोपीशी एकदाही भेटली नव्हती.
विविध पूजा, बळी सांगून अधिकचे पैसे आरोपी मागत असल्याने आपली फसगत होत असल्याचे लक्षात आल्यावर तिने आरोपीकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. त्यावर तुला काळी जादू करून अपघात घडवेन अशी धमकी दिल्यावर या युवतीने खारघर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणूक व महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी कृत्य प्रतिबंध व निर्मूलन व काळी जादू नियम अन्वये गुन्हा नोंद केला होता,
खारघर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा यांचा समांतर तपास सुरू होता. पीडित युवतीने ज्या बँक खात्यात पैसे टाकले, त्याची ओळख, मोबाइल लोकेशन तपासणी मोबाइल क्रमांक इतिहास (सीडीआर), वेगवेगळे गूगल पे क्रमांक आदींची सखोल माहिती मिळवली. हा तपास सुरू असताना गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना हा आरोपी मीरा रोड परिसरात असून गोविंदनगर येथे तो येणार असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे , पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे, रूपेश पाटील, इंद्रजीत कानू, दीपक डोंगरे, आदिनाथ फुंदे यांच्या पथकाने दिवसभर सापळा लाऊन रात्री उशिरा वसिम रईस खान ऊर्फ बाबा कबीर खान बंगाली यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यााची कबुली देताच त्याला अटक करण्यात आले. आरोपी हा मूळ मेरठ उत्तर प्रदेश येथील असून २०१३ मध्ये मुंबईत आला. तेव्हापासून अशी फसवणूक करत होता. त्याने याद्वारे अनेकांना फसवले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी केले आहे.