गायक सोनू निगम व निर्माता भूषण कुमार यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला आहे. गायक सोनू निगमने टी-सीरिजच्या भूषण कुमारला मरीना कंवर हिच्यावरून इशारा दिला. माझ्याशी पंगा घेतलास तर मरीना कंवरचा व्हिडीओ मी पोस्ट करेन, असा इशारा सोनू निगमने दिला. तेव्हापासून ही मरीना कंवर आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मरीना कंवर ही अभिनेत्री व मॉडेल आहे. 'मी टू' मोहिमेअंतर्गत तिने दिग्दर्शक साजिद खान व भूषण कुमारवर गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत मरीनाने सांगितलं होतं, की भूषण कुमारने व्हिडीओत काम देण्याच्या नावाखाली घरी बोलावलं आणि गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला होता. सोनू निगमने हाच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा इशारा भूषण कुमार दिला. मरीनाने नंतर माघार का घेतली, तिला गप्प का केलं याचाही खुलासा करण्याचा इशारा सोनू निगमने दिला. मरीनाने 'जग्गू दादा', 'सीआयडी', 'आहट' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मरीनाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित नैराश्यात असल्याचाही खुलासा केला आहे. 'जेव्हा काही अनपेक्षित घटनांमुळे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलतं, तेव्हा तुम्ही नैराश्यात जाण्याचा पर्याय निवडता. त्या घटनांचा तुमच्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम झाला हे कोणीच ओळखत नाही. कधी कधी आपण हार मानतो आणि आयुष्याचा शेवट करतो', अशी पोस्ट मरीनाने नुकतीच लिहिली आहे. संगीत क्षेत्रातही मक्तेदारी चालते असं म्हणत सोनू निगमने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर दुसऱ्या व्हिडीओत त्याने थेट भूषण कुमारचं नाव घेत त्याला धमकीवजा इशारा दिला.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”