फेअरनेस क्रीम ‘फेअर अँड लव्हली’मधून फेअर हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेअर अँड लव्हलीची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हरने नावात बदल करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्री बिपाशा बासूने या निर्णयाचं स्वागत केलं असून बॉलिवूडमधल्या तिच्या प्रवासाबद्दलही सांगितलं. सावळ्या रंगामुळे हिणवल्याचं तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित सांगितलं. तिने लिहिलं, "मी लहानाची मोठी होताना अनेकदा ऐकलंय की बोनी ही सोनीपेक्षा फार सावळी आहे. माझी आईसुद्धा सावळी आहे आणि मी बऱ्याच अंशी तिच्यासारखी दिसते. पण मी लहान असताना अनेक नातेवाइक माझ्या रंगावरून चर्चा करायचे." बिपाशाने १५-१६ वर्षांची असल्यापासून मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने सुपरमॉडल ही स्पर्धासुद्धा जिंकली होती. याविषयी तिने लिहिलं, "स्पर्धा जिंकल्यानंतर सर्व वृत्तपत्रांमध्ये हेच लिहिलं होतं की, कोलकाताची सावळी मुलगी विजेती ठरली." सावळा रंग हे मला वर्णन करण्यासाठी विशेषण कसं असू शकतं, असा सवाल तिने केला. "विविध मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मी जगभरात फिरले. त्यानंतर जेव्हा भारतात आले तेव्हा मला पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली. 'अजनबी' या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण माझ्या नावासोबत सावळा हा शब्द तसाच राहिला. मला माझा रंग प्रिय आहे. पण हाच नेहमी चर्चेचा मुख्य विषय असायचा," असं तिने सांगितलं. गेल्या १८ वर्षांत सौंदर्य प्रसाधनांच्या कंपनींचे खूप सारे ऑफर्स आल्याचं तिने सांगितलं. पण बिपाशाने त्यांना साफ नकार दिला. "काही ऑफर्स तर मला खूप पैसा द्यायला तयार होते. पण मी माझ्या मूल्यांशी प्रामाणिक राहिले", असं ती म्हणाली. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचं तिने स्वागत केलं आहे. इतरही दुसऱ्या कंपन्यांनी हा आदर्श घ्यावा असं तिने पोस्टच्या शेवटी लिहिलं. गोरं होण्यासाठी या क्रीमचा वापर करा अशी जाहिरात करत असल्याने वारंवार फेअर अॅण्ड लव्हली ब्रॅण्डवर टीका झाली आहे. जाहिरातीमधून रंगभेद होत असल्याची टीकाही वारंवार झाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी याच कारणामुळे याची जाहिरात करण्यास नकारही दर्शवला होता. त्यामुळे अखेर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

Asia Cup 2025: पाकिस्तानचा बहिष्कार! IND vs PAK सामन्याआधी PCB ने घेतला मोठा निर्णय