अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नैराश्य आणि मानसिक स्वास्थाविषयी जनजागृती हे दोन विषय सर्वाधिक चर्चेत आले. अनेक सेलिब्रिटींनी याआधीही नैराश्यावर मात केल्याचे अनुभव चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. केवळ हिंदीच नव्हे तर मराठीतील कलाकारांनीही मोकळेपणाने नैराश्यावर भाष्य केलं आहे. यामध्ये अभिज्ञा भावे, तेजश्री प्रधान, सुयश टिळक, रुपाली भोसले इत्यादी कलाकारांचा समावेश आहे. तेजश्री प्रधान- 'कानाला खडा' या कार्यक्रमात तेजश्रीने तिच्या करिअरमधील चढउतार व खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या होत्या. शशांक केतकरला घटस्फोट दिल्यानंतर कॅमेरासमोर उभं राहू शकेन की नाही, इतकी ती खचली होती. घरातही ती फारशी कोणाशी बोलत नव्हती. कुटुंबीय व जवळच्या मित्र मैत्रिणींच्या मदतीने तिने या नैराश्यावर मात केली. अभिज्ञा भावे- 'तुला पाहते रे' मालिकेतील मायरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अभिज्ञा भावेनंही नैराश्यावर मात केली. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित तिने हा अनुभव सांगितला होता. 'इतरांसमोर कमकुवत होऊ नका असं आपल्याला शिकवलं जातं. पण कधीतरी कमकुवत राहण्यात काहीच गैर नसतं. अशावेळी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यात काहीच चुकीचं नाही. तुम्ही वेडे नाही आहात. मीसुद्धा या टप्प्यांतून गेले आहे. लोक तुमची खिल्ली उडवतील, तुम्हाला वेडे म्हणतील पण तुमच्या कमकुवत बाजूला तुमची शक्ती बनवा', असं तिने लिहिलं होतं. सुयश टिळक- अभिनेता सुयश टिळकनेही नैराश्यावर यशस्वीरित्या मात केली आहे. नैराश्यात कुटुंबीय व जवळचे मित्रमैत्रीण यांची साथ असणं खूप गरजेचं असतं असं त्याने म्हटलं होतं. रसिका सुनील – 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील हिनेसुद्धा अनेकदा मानसिक आरोग्य व नैराश्यावर वक्तव्य केलं आहे. अशा वेळी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल न उचलता इतरांशी बोलणं किती महत्त्वाचं असतं हे तिने वारंवार तिच्या पोस्टमधून व वक्तव्यांमधून स्पष्ट केलं आहे. रुपाली भोसले – 'बिग बॉस मराठी २' या रिअॅलिटी शोमधून चर्चेत आलेली अभिनेत्री रुपाली भोसलेने सोशल मीडियावरील ट्रोलिंगविरोधात तक्रार दाखल केली होती. 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने या ट्रोलिंगचा तिच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला, याविषयी सांगितलं होतं. रोहन पेडणेकर – 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता रोहन पेडणेकर लॉकडाउनदरम्यान नैराश्याचा शिकार झाला होता. शूटिंग बंद झाल्यामुळे ओढावलेलं आर्थिक संकट व कुटुंबाची जबाबदारी यांमुळे नैराश्य आल्याचं त्याने सोशल मीडियावर सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर आत्महत्येसारखा विचारही मनात डोकावून गेला, पण मी टोकाचं पाऊल उचलणार नाही, असं तो म्हणाला. त्याने नुकताच लघुउद्योग सुरू केला असून प्रेक्षकांना मदतीचं आवाहन केलं आहे.

बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये जगावर मोठं संकट कोसळणार? AI वरील तर… खतरनाक भाकितं वाचून बसेल धक्का