-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बकुळ नामदेव घोटाळे या चित्रपटापासून करिअरची सुरुवात केली. तेव्हापासून तिने अनेक दमदार भूमिका साकारल्या.
आता बारा वर्षांनंतर सोनालीला तिच्या 'हिरकणी' या चित्रपटासाठी खास पुरस्कार मिळाला आहे. झी गौरव पुरस्कार सोहळ्यात सोनालीने तिची छाप सोडली आहे. बाप्पाची कृपा, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद असं म्हणत सोनालीने हा पुरस्कार तमाम "हिरकण्यां"ना समर्पित केला आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी सोनालीचा खास अंदाज पाहायला मिळाला. नऊवारी साडी, त्यावर पारंपरिक दागिने, नथ असा तिचा लूक भुरळ पाडणाराच आहे. सोनालीच्या या नऊवारी साडीतील फोटोंची चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. 'हिरकणी' या चित्रपटाची संकल्पना सोनालीकडूनच समोर आली. पाठय़पुस्तकातून ऐकलेल्या, वाचलेल्या कवितेपलीकडे जाऊन हिरकणीचा शोध घेणे हे आव्हान चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व कलाकारांवर होते. प्रत्येक चित्रपटातून एक नवं रूप साकारणारी सोनाली या चित्रपटात हिरकणीच्या भूमिकेत प्रेक्षकांना खूपच आवडली. आरसपानी सौंदर्य असणारी तमाशातली मुलगी असो, गृहिणी असो वा इतिहासकालीन हिरकणी… सोनालीने सर्व भूमिका चोख साकारल्या. स्वत: आई नसताना चित्रपटात मातृत्वाची भावना निर्माण करणे अधिक आव्हानात्मक होते, असे सोनालीने सांगितले. केवळ चित्रपटातील भाषाच नव्हे, तर शेण सारवणे, गाईचे दूध काढणे अशा सर्वच गोष्टी सहज जमण्यासाठी सोनालीने सराव केला. विशेष म्हणजे केवळ ३२ दिवसांत 'हिरकणी' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. -
(सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, सोनाली कुलकर्णी)

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”