अभिनयाशिवाय इतरही क्षेत्रात सक्रिय असणारे बरेच कलाकार मराठी कलाविश्वात आहेत. या इंडस्ट्रीतून यशस्वी उद्योजक ठरलेले कलाकार कोणते ते पाहुयात.. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम) अभिज्ञा भावे- 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री अभिज्ञा भावेनं एअर होस्टेसचं प्रशिक्षण घेतलं. अभिनयातही करिअर करणाऱ्या अभिज्ञाने तिची खास मैत्रीण तेजस्विनी पंडित हिच्यासोबत मिळून कपड्यांचा एक ब्रँड लाँच केला. अभिज्ञाला फॅशन डिझाइनिंगमध्ये रस आहे. तेजस्विनी पंडित- 'तेजाज्ञा' हा कपड्यांचा ब्रँड अभिज्ञा भावे आणि तेजस्विनीने मिळून लाँच केला. तरुणांमध्ये हा ब्रँड चांगलाच लोकप्रिय आहे. शशांक केतकर- श्री या नावाने घराघरात ओळखला जाणारा अभिनेता शशांक केतकर याचं पुण्यात एक रेस्टॉरंट आहे. 'आईच्या गावात' असं या रेस्टॉरंटचं नाव आहे. आरती वडगबाळकर- अभिनेत्री आरतीचाही कपड्यांचा व्यवसाय आहे. आरती गायिका, अभिनेत्री, निर्माती आणि यशस्वी डिझाइनरसुद्धा आहे. अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ चांदेकर यांसारखे मराठी कलाकार तिच्या कपड्यांच्या ब्रँडसाठी फोटोशूट करताना दिसतात. क्रांती रेडकर- अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर तिच्या भन्नाट विनोदी व्हिडीओमुळे चर्चेत असते. क्रांतीचाही कपड्यांचा व्यवसाय आहे. यासोबतच तिने नुकतंच ज्वेलरी ब्रँडसुद्धा लाँच केलं आहे. पराग कान्हेरे- 'बिग बॉस मराठी २' फेम पराग कान्हेरे हा सेलिब्रिटी शेफ आहे. परागने नुकतंच एक रेस्टॉरंट सुरू केलं असून त्या विविध प्रकारचे वडापाव ही त्या रेस्टॉरंटची खासियत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्याने हा नवीन व्यवसाय सुरू केला. खर्डा वडापाव, चुरा वडापाव असे भन्नाट वडापावची चव त्याच्या रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळते. अपूर्वा नेमळेकर- 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ज्वेलरी डिझाइनरसुद्धा आहे. अपूर्वा तिचे अनेक डिझाइन्स सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. निवेदिता सराफ- 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत आसावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा साड्यांचा व्यवसाय आहे. 'हंसगामिनी' असं त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचं नाव आहे.

नकाशावरून पुसून टाकण्याच्या धमकीला पाकिस्तानचं उत्तर; म्हणाले, “भारतात घुसून…”