-
मुंबईमधील एका फाइव्ह स्टार हॉटलेमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्याचे सर्वाजनिक बांधकाम, नगरविकासमंत्री मंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे अभिनेता प्रसाद ओकच्या पाया पडले.
-
आता हे वाक्य वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असणार पण खरोखरच मुंबईमधील वरळी येथील ब्लू सीज या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.
-
निमित्त होतं ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चचं.
-
ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवप्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च गुरुवारी मुंबईत पार पडलं.
-
आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे.
-
या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे.
-
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आनंद दिघेंसारखं केवळ दिसणं नाही तर त्यांच्या छोट्यामोठ्या सवयी आणि स्टाइल प्रसादने अगदी हुबेहुब कॅरी केलीय.
-
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर अनेकांनी प्रसादच्या या लूकचं कौतुक केलंय.
-
विशेष म्हणजेच प्रसादचा हा लूक पाहून आनंद दिघेंना राजकीय गुरु मानणारे एकनाथ शिंदेही भारवून गेल्याचं पहायला मिळालं.
-
त्यामुळेच आनंद दिघेंप्रमाणे खांद्यावर रुमाल टाकून प्रसाद जेव्हा आनंद दिघेंच्या लूकमध्येच म्युझिक लॉन्चसाठी मंचावर पोहोचला तेव्हा एकनाथ शिंदे वाकून प्रसादच्या पाया पडले.
-
अभिनेता प्रसाद ओकने हुबेहूब साकारलेल्या पडद्यावरील आनंद दिघेंचे रूप पाहून एकनाथ शिंदे देखील भावूक झाले.
-
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक शिवसैनिकांनी यामधून एकनाथ शिंदेंनी त्यांच्या राजकीय गुरुबद्दलचा आदर अनोख्या पद्धतीने व्यक्त केल्याचं म्हटलं आहे.
-
त्यानंतर प्रसादनेही आनंद दिघे ज्याप्रमाणे खांद्यावर हात ठेऊन कार्यकर्त्यांसोबत फोटो काढायचे तसाच फोटो एकनाथ शिंदेंसोबत काढला.
-
“या सिनेमाच्या माध्यमातून गुरुवर्य आनंद दिघे नक्की कोण होते, सर्वसामान्य माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी कसं संघर्षमय आयुष्य जगलं त्याची गाथा पहिल्यांदाच मोठया पडद्यावर येणार आहे,” असं एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमासंदर्भातील फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.
-
“त्यांचा आदेश आम्हा सगळ्यासाठी शिरसावंद्य होताच, पण त्यांचं सोबत असणं देखील प्रत्येक शिवसैनिकाला भक्कम आधार देणारं होतं,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
-
“ते (आनंद दिघे) होते म्हणून मी आज इथे आहे,” असे भावोद्गार यावेळी बोलताना शिंदे यांनी व्यक्त केले.
-
या चित्रपटामध्ये अभिनेता क्षितिज दातेने एकनाथ शिंदेंची भूमिका साकारलीय.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं असून निर्माते मंगेश देसाई आहेत.
-
यावेळी आनंद दिघेंच्या भगिनी अरुणाताई गडकरीसुद्धा उपस्थित होत्या.
-
भवानी पतपेढीचे अध्यक्ष अशोक पुराणिक, राबोडी येथील सरस्वती हायस्कूलच्या प्राचार्या मीरा कोरडे, ज्येष्ठ पंचांगकर्ते दा.कृ. सोमण, ज्येष्ठ शिवसैनिक उद्धवराव जगताप, ज्येष्ठ पोलीस अधिकारी संजय मोहिते यांनी देखील आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला.
-
सर्व जुने जाणते शिवसैनिक, धर्मवीर सिनेमातील सर्व कलावंत तंत्रज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते.
-
येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो एकनाथ शिंदेंच्या फेसबुक अकाऊंटवरुन साभार)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक