-
डॉन हा अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेला आणि चंद्रा बारोट यांनी दिग्दर्शित केलेला सुपरहिट सिनेमा आहे. या सिनेमाची कथा अर्थातच त्या काळात हिट चित्रपट देणाऱ्या सलीम जावेद यांची आहे. (सर्व फोटो सौजन्य-सोशल मीडिया आणि अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम पेज)
-
चंद्रा बारोट यांचं आज निधन झालं, मात्र डॉन हा चित्रपट कधीही विसरता येणार नाही. कारण एक अजरामर कलाकृती चंद्रा बारोट यांनी दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटाशी संबंधित काही रंजक किस्से आपण जाणून घेऊ.
-
‘डॉन’ हा चित्रपट १९७८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रा बारोट यांनी केले होते आणि नरिमन इराणी यांनी निर्मिती केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, झीनत अमान आणि प्राण यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘डॉन’मध्ये अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका होती.
-
डॉन चित्रपट तब्बल ५० आठवडे थिएटरमध्ये राहिला. ५० आठवड्यांनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण ७.२ कोटींची कमाई केली होती. त्याकाळी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपये कमावणं ही खूप मोठी गोष्ट होती.
-
अमिताभ बच्चन यांच्याआधी देव आनंद, धर्मेंद्र व जीतेंद्र या तेव्हाच्या आघाडीच्या तीन अभिनेत्यांना ‘डॉन’ची ऑफर देण्यात आली होती. मात्र या तिघांनाही वेगवेगळ्या कारणांनी नकार दिला होता. त्यानंतर हा चित्रपट अमिताभ बच्चन यांना ऑफर करण्यात आला. त्यांनी ‘डॉन’साठी होकार दिला आणि त्यांच्या करिअरमधील उत्तम सिनेमांच्या यादीत आयकॉनिक ‘डॉन’चा समावेश झाला. -
डॉन या चित्रपटाबाबत चंद्रा बारोट आणि नरिमन इराणी यांना मनोज कुमार यांनी सल्ला दिला होता की या चित्रपटाचं नाव मिस्टर डॉन ठेवा. कारण त्या काळात डॉन हा प्रसिद्ध अंडरवेअर ब्रांड होता. मात्र निर्माता आणि दिग्दर्शक दोघांनीही रिस्क घेतली आणि चित्रपटाचं नाव डॉनच ठेवलं. त्यांची रिस्क फळाला आली.
-
डॉन चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे यातली गाणी, ये मेरा दिलपासून अरे दिवानो, जिसका मुझे था इंतजार, खईके पान बनारसवाला पर्यंत एकाहून एक गाणी हिट होती.
-
डॉन चित्रपटातलं खईके पान बनारसवाला हे गाणं चित्रपटात नव्हतं, ते देवानंद यांच्या एका चित्रपटासाठी लिहिलं होतं. ज्याचा समावेश यात करण्यात आला आणि ते सुपरहिट झालं.
-
खई के पान बनारस वाला गाण्याचा एक किस्सा असाही सांगितला जातो की अमिताभ बच्चन यांनी या गाण्याच्या शुटिंगसाठी ४० पानं एका दिवसात खाल्ली होती. इतकंच नाही तर गायक किशोर कुमार यांनीही पान खाऊनच गाणं म्हटलं होतं. पान थुंकण्यासाठी एक मोठं प्लास्टिकही गाण्याच्या स्टुडिओत पसरवण्यात आलं होतं.
-
डॉन चित्रपटाचं शुटिंग १९७४ मध्ये सुरु झालं होतं पण चित्रपट तयार व्हायला साडेतीन वर्षे गेली. चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण होण्याआधीच निर्माते नरिमन ए इराणी यांचा मृत्यू झाला. अमिताभ बच्चन यांनी या घटनेचा उल्लेख त्यांच्या एका ब्लॉगमध्ये केला होता. तर चंद्रा बारोट यांनी चित्रपट तयार व्हावा म्हणून ४० हजारांचं कर्ज काढलं होतं.

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल