-
फॅशन डिझायनिंग, फोटोशूट, रॅम्प, ग्लॅमर ही सारी समीकरणं एका सुडौल मॉडेलवर येऊन थांबतात. केरळच्या एका फॅशन डिझायनरनं ग्लॅमर आणि फॅशन जगतातील हीच समीकरणं काहीशी बदलायचं ठरवलं. आपल्या नव्या कलेक्शनसाठी तिने ‘ट्रान्सजेन्डर’ मॉडेल्ससह फोटोशूट केलं आणि फॅशनजगतात एक नवा पायंडा पाडला.
-
एका तरुण फॅशन डिझायनरचं हँडलूम साडय़ांचं नवं कलेक्शन.. त्याचं फोटोशूट म्हटलं की डोळ्यासमोर येणारं उंच, सडपातळ, गोऱ्यागोमटय़ा मॉडेल्स. या लेखासोबतचे फोटो बघतानाही कदाचित काही जणांना तेच वाटेल. पण कदाचित मॉडेलिंगबाबतच्या आपल्या संकुचित विचारसरणीला छेद देण्यासाठीच शर्मिला नायर या डिझायनरनं आपल्या ‘रेड लोटस’ याअंतर्गतच्या नव्या कलेक्शनसाठी दोन वेगळ्या मॉडेल्स निवडल्या.
-
शर्मिलाने आपल्या ‘मझविल’ नामक हँडलूम साडय़ांच्या कलेक्शनसाठी माया मेनन आणि गौरी सावित्री या दोन सुंदर मॉडेल्सना घेऊन फोटोशूट पार पाडलं. हे फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल झालं.
-
जगभरात शर्मिलाच्या या कलेक्शनचे फोटो पोचले. कारण या दोन्ही मॉडेल्स ट्रान्सजेन्डर आहेत. शर्मिलाच्या या आगळ्यावेगळ्या धाडसाचं फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून कौतुक होत आहे.
-
काही महिन्यांपूर्वी केरळ सरकारने ‘एलजीबीटी’ समुदायाला समान हक्क व सन्मान मिळावा यासाठी देशातील पाहिलं धोरण जाहीर केलं आणि तेव्हापासूनच आपणही या समुदायासाठी काही तरी केलं पाहिजे ही प्रेरणा शर्मिलाला मिळाली. याच प्रेरणेतून ‘मझविल’चा जन्म झाला!
-
माया मेनन आणि गौरी
-
मझविल म्हणजेच इंद्रधनुष्य..सदैव हालआपेष्टा, तिरस्कार, अवहेलना व प्रसंगी दारिद्रय़ाला सामोरं जाणाऱ्या या समुदायातील लोकांच्या आयुष्यात इंद्रधनुष्यातील काही रंग भरण्याचा प्रयत्न शर्मिलाने केला आणि त्याला सर्व बाजूंनी भरभरून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
-
माया मेनन
-
यापूर्वी मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये ‘डाउट इज आउट’ या कलेक्शनच्या सादरीकरणात लक्ष्मी त्रिपाठी या ट्रान्सजेन्डर कार्यकर्तीला शो स्टॉपर म्हणून रॅम्पवर आणण्यात आलं होतं. लक्ष्मी स्वत: कार्यकर्त्यां आहेत. गौरी आणि माया मात्र सर्वसामान्य बेरोजगार तरुण म्हणून जगत आहेत.
-
गौरी आणि माया या दोघीही पुरुषाच्या शरीरात बंदिस्त असलेल्या पदवीधर स्त्रिया असूनही त्यांच्या ‘तिसरे’पणामुळे अद्यापही बेरोजगार आहेत. या दोघींनी या फोटोशूट दरम्यान आपल्यातल्या स्त्रीत्वाला इतक्या सुंदर प्रकारे व्यक्त केलंय की बघणारा अवाक् होऊन जाईल. त्या सुंदरतेला दाद देल्याखेरीच त्याला राहणार नाही.
-
या फोटोशूटबद्दल बोलताना गौरी म्हणते, ‘मी याआधी कधीही मॉडेलिंग केलेलं नाही. हा मंच आमच्यासाठी खुला नाहीये. मला साडी नेसायला आवडतं, मला त्यामुळे पूर्णत्वाची भावना मिळते.’
-
माया मेनन, जी पूर्वी आपल्या बहिणीच्या साडय़ा लपून वापरायची तीही आपल्याला साडी नेसायला आवडतं हे आता उघडपणे मान्य करते.
-
शर्मिला नायरचं हे पाऊल भारतात ‘ट्रान्सजेन्डर’ मॉडेल्ससाठी नक्कीच एक नवी संधी ठरणार आहे.
-
त्यामुळे माया आणि गौरी यांपैकी कोणीही जर तुम्हाला फॅशनजगतात दिसल्या तर अवाक् होण्याचं कारणच नाही.
-
गौरी
-

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय