-
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात निधन झाले.
-
जयललिता यांची प्रकृती सुधारत आहे, असे वाटत असतानाच त्यांना रविवारी संध्याकाळी हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने चिंताजनक होती. अखेर काल रात्री ११.३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
-
'अम्मा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जयललिता यांचे पूर्ण नाव जयललिता जयारामन असे आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी अनेक तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमधून अभिनय केलेला आहे.
-
शालेय शिक्षण घेताना त्यांनी 'एपिसल' या इंग्रजी चित्रपटातही काम केले होते. दहावीच्या परीक्षेत त्यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवत राज्य सरकारचा गोल्ड स्टेट अॅवॉर्ड मिळवला होता.
तामिळ भाषेसह कन्नड, मल्याळम, तेलगू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर जयललिता यांचे प्रभुत्व होते. वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी कन्नड चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका केली. त्यानंतर प्रामुख्याने तमिळ चित्रपटात काम केले. दक्षिण भारतातील स्कर्ट घालून काम करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. आपल्या प्रवेशाने लाखो लोकांना हरखून टाकण्याची आणि जाण्याने तेवढ्याच लोकांना चटका लावण्याची क्षमता जयललितांमध्ये नक्कीच होती. त्यांचा जन्म अयंगार ब्राह्मण परिवारातला. म्हैसूरच्या महाराजांच्या डॉक्टरांची त्या नात होत्या. कोमलवल्ली हे त्यांचे मूळ नाव. आजोबांच्या मृत्यूनंतर आई संध्या (मूळ नाव वेदवल्ली) आणि कोमलवल्ली चेन्नईला आल्या. संध्या चित्रपटांत छोटी-मोठी कामे करून चरितार्थ चालवत असे. जयललितांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आणि लगेच त्यांचा चित्रपटांत प्रवेश झाला. -
‘चिन्नद गोंबे’ या कन्नड चित्रपटांतून जयललितांनी चंदेरी दुनियेत प्रवेश केला. ‘वेन्निरा आडै’ (विधवेची वस्त्रे) हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट. एमजीआर नामक नटवराच्या पारखी नजरेने या नव्या तारकेतील चमक हेरली आणि त्यांना ‘आयिरत्तिल ओरुवन’ या चित्रपटात संधी मिळाली.
-
Political leader Jayalalitha. Express archive photo
-
त्यानंतर दोघांची जोडी जमली आणि रसिकांनी दोघांनाही डोक्यावर घेतले. जयललितांनी काम केलेल्या सुमारे ११५ चित्रपटांतील २८ चित्रपट या दोघांच्या जोडीचे आहेत. त्या चित्रपटाच्या यशामुळे एमजीआर आणि जयललितांमधील जवळीक वाढली.
अभिनेत्री म्हणून जयललितांची कारकीर्द फारशी उठावदार नव्हतीच. १९९२ साली आलेला ‘निंग नल्ला इरुक्कनुम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. हिंदीत त्यांनी ‘इज्जत’ चित्रपटात धर्मेंद्रबरोबर काम केले होते. -
जयललितांचे आज हाडवैरी असलेले करूणानिधी हे एमजीआर यांचे जवळचे सहकारी. ते स्वतः लेखक आणि कवी म्हणून प्रसिद्ध होते. करुणानिधी यांनी चित्रपटाची पटकथा व संवाद लिहायचे, त्यावर एमजीआर यांनी अभिनय करून प्रेक्षकांची वाहवा मिळवायची आणि द्रविड मुन्नेत्र कळगम पक्षाचा प्रचार करायचा, असे ते सूत्र होते. द्रविड चळवळीच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. मात्र द्रमुकचे संस्थापक अण्णादुरै यांच्यानंतर करुणानिधी यांनी पक्षाचा ताबा घेतला. त्यामुळे या दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाला.
एमजीआर यांनी स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेट्र कळगम पक्ष स्थापन केला. त्यावेळी अन्य सहकाऱ्यांसह त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या पडद्यावरील जोडीदार जयललिता. एमजीआर यांच्यापेक्षा त्या १४ वर्षांनी लहान. करुणानिधीसारख्या भाषाप्रभू नेत्याला टक्कर देण्यासाठी एमजीआर यांना तशाच तोलामोलाची व्यक्ती हवी होती. फारशा शिकलेल्या नसूनही अफाट वाचन आणि कुशाग्र बुद्धिमत्ता यांच्या जोरावर जयललितांनी राजकीय समज विकसित केली होती. त्यामुळे आपसूकच जयललितांकडे अण्णा द्रमुकच्या प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्याकडे पक्षाचे प्रचार सचिव हे पद देण्यात आले. कमावलेला चाणाक्षपणा, धीटपणा आणि माहिती यांच्या जोरावर जयललितांनी द्रमुकच्या तोडीस तोड काम करायला सुरवात केली. अण्णा द्रमुकच्या यशात त्यामुळे जशी भर पडत गेली, तशीच एमजीआरही त्यांच्यावर अधिकाधिक अवलंबून राहायला लागले. त्याचा परिणाम म्हणून अण्णा द्रमुक पक्षात त्यांच्याबद्दल कुजबुज वाढत गेली. पक्ष वाढवायचा असेल, तर जयललितांना दूर ठेवावे लागेल, असे अन्य नेत्यांनी सांगितल्यामुळे एमजीआरनी त्यांना हातभर अंतरावर ठेवायला सुरवात केली. पुरूष नेत्यांमुळेच हे घडले, ही बाब त्या कधीही विसरल्या नाहीत. त्याचे वारंवार उट्टे काढत त्यांनी त्याचे जाहीर प्रदर्शनही केले. मद्रास विद्यापीठाने जयललिता यांना १९९१ मध्ये मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती. त्यानंतर त्यांना अनेक विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. १९९७ मध्ये त्यांच्या जीवनावर 'इरूवर' या तामिळ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये ऐश्वर्या रायने जयललितांची भूमिका साकारली होती. -
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मॉँटेकसिंग अहुवालिया यांच्याबरोबर जयललिता यांचे टिपलेले छायाचित्र.
१९८८ साली राज्याच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून जयललितांची नियुक्ती झाली. याच दरम्यान करुणानिधी आणि जयललिता यांच्यातील हाडवैराची पायाभरणी झाली. विरोधी पक्षाच्या नेत्या या नात्याने जयललितांनी करुणानिधी सरकारवर टिकेचा भडीमार केला होता. राज्यसभेपासून संसदीय कामकाजातील खाचाखोचा माहीत असल्याने त्या आयुधांचा उपयोग करून सरकारला घेरण्याची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती. -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर जयललिता यांचे टिपलेले छायाचित्र.
-
The All India Anna Dravida Munnetta Kazhagam (AIADMK) leader Jayalalitha submitting memorandum to the Prime Minister Chandrashekhar at his residence in New Delhi. PTI photo on 29.12.1990
दुसऱ्या कारकीर्दीत (२००१-२००६) त्यांचा भ्रष्टाचार कमी झाला, प्रशासन तर त्या उत्तम चालवितच. याच काळात २००४ साली आलेल्या त्सुनामीने होत्याचे नव्हते केले. मात्र अत्यंत कमी काळात अफाट कौशल्याने त्यांनी ते पुनर्वसन केले. आजवर त्या कामाबाबत एकही तक्रार नाही, हीच त्यांच्या कौशल्याची पावती होय. -
दुसऱ्या कारकीर्दीत (२००१-२००६) त्यांचा भ्रष्टाचार कमी झाला, प्रशासन तर त्या उत्तम चालवितच. याच काळात २००४ साली आलेल्या त्सुनामीने होत्याचे नव्हते केले. मात्र अत्यंत कमी काळात अफाट कौशल्याने त्यांनी ते पुनर्वसन केले. आजवर त्या कामाबाबत एकही तक्रार नाही, हीच त्यांच्या कौशल्याची पावती होय.
-
जयललिता यांच्या बुद्धिमत्तेचे अनेक किस्से तमिळनाडूत सांगितले जातात. त्यांना शिकविण्यासाठी एमजीआरनी काही जणांची नियुक्ती केली होती. त्यातील एक त्यांना इंग्रजी साहित्य शिकवित असे. एकदा या शिक्षकाने त्यांना शेक्सपियरची काही वाक्ये ऐकविली. तो शिक्षक जिथे थांबला, त्या वाक्यापासून पुढे संपूर्ण उतारा जयललितांनी त्याला ऐकविला होता!
-
न्यायालयाच्या निकालामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, तेव्हा त्यांच्या जया टीव्ही या वाहिनीवर त्यांचा उल्लेख ‘मक्कळ मुदलवर’ म्हणजे जनतेच्या मुख्यमंत्री असाच व्हायचा!
-
रुपेरी पडद्यावर नाना भूमिका वठविल्या असल्या, तरी लढवय्या महिला आणि राज्यकर्ती महाराणी या वास्तव जीवनातील त्यांच्या भूमिकाच लोकांच्या मनावर ठसल्या. ब्राह्मण कुटुंबाची पार्श्वभूमी, कर्नाटकात गेलेले बालपण आणि पुरुषप्रधान वातावरण, अशा परिस्थितीतही त्यांनी एकहाती यश मिळवून दाखवले. एकदा नव्हे, अनेकदा! लोकांच्या लक्षात राहील ते त्यांचे मेकअपांकित रूप नव्हे, तर योद्ध्यासारखी दिलेली लढत आणि महाराणीचा रुबाब!

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग