-
देव देव करत फिरणाऱ्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांपासून आध्यात्मिक गुरुंचं स्थानही महत्त्वाचं झालं आहे. फक्त सर्वसामान्यच नव्हे तर काही प्रसिद्ध चेहऱ्यांवरही या अध्यात्मिक गुरुंचा प्रभाव पाहायला मिळतो. पण, अध्यात्माच्या नावावर काही गुरुंचा राक्षसी चेहराही समोर आला आहे. स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्याविरोधातील न्यायालयीन सुनावणीच्या निमित्ताने अशाच स्वयंघोषित अध्यात्मिक आणि वादग्रस्त गुरुंची नावं प्रकाशझोतात आली आहेत. फसवणूकीपासून ते बलात्कारापर्यंतचे गंभीर आरोपही या गुरुंवर करण्यात आले होते. त्यापैकीच काही गुरु आहेत….
स्वामी परमानंद- मुळच्या श्रीलंकेतील असणाऱ्या स्वामी परमानंदचा आश्रम तिरुचीमध्ये होता. तामिळनाडूमध्ये त्याची बरीच संपत्ती आणि उपासक होते. १९९७ मध्ये १३ मुलींच्या बलात्कार प्रकरणी त्याला दोनदा आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तोवर युके, बेल्जियम, स्वित्झर्लंड या देशांमध्येही त्याच्या आश्रमाच्या शाखा सुरु करण्यात आल्या होत्या. २१ फेब्रुवारी २०११ मध्ये कारावासाची शिक्षा भोगत असतानाच त्याचा मृत्यू झाला. -
इच्छाधारी संत स्वामी भीमानंद – या गुरुवर सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यानंतर त्याला प्रथम दिल्ली आणि त्यानंतर मुंबई येथून अटक करण्यात आली होती.
संत रामपाल- स्वत:ला कबीराचा अवतार म्हणवणाऱ्या संत रामपालचा हरियाणामधील बरवाला येथे जवळपास १२ एकरांच्या भूभागावर आश्रम उभा आहे. १९९९ मध्ये हरियाणातील रोहतकमध्ये त्याने सतलोक आश्रमाची स्थापना केली. त्याच्या आश्रमात पाच महिला आणि अठरा महिन्यांच्या नवजात बालकाचा मृतहेद आढळल्यामुळे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांना त्याच्या समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. गुरमीत बाबा राम रहिम- राम रहिमवर त्याच्याच आश्रमातील दोन साध्वींवर बलात्कार केल्याचा आणि त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. २००१-२००२ च्या दरम्यान हे प्रकरण घडलं होतं, त्यानंतर इतरही अनेक वादांमध्ये राम रहिम अडकला होता. २००२ मध्ये पत्रकार रामचंद्र यांची हत्या झाली होती त्याचाही आरोप बाबा राम रहिमवर आहे. -
परमहंस नित्यानंद- स्वत:ला अवतापुरुष म्हणवणाऱ्या परमहंस नित्यानंदविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोपही करण्यात आले होते. त्याशिवाय दाक्षिणात्य अभिनेत्री रंजितासोबतच्या एका व्हिडिओमध्ये त्याच्या रासलीला व्हायरल झाल्या होत्या.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट