-
माजी मंत्री, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमातून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त निमंत्रित करताना समर्थकांना ‘मावळे’ शब्दाने हाक देत पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? असा मजकूर प्रसारित केला होता. त्यात पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सदिच्छा भेट घेतली होती. त्यातून पंकजा मुंडे या नाराज असून त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील सुप्त संघर्ष असल्याच्या चर्चेलाही हवा मिळू लागली. मात्र अशाप्रकारे भाजपामध्ये नाराज असणाऱ्या एकमेव नेत्या नाहीत. त्यांच्याबरोबरच इतरही काही नेते भाजपामध्ये नाराज असल्याचे समजते. जाणून घेऊयात अशा काही नेत्यांबद्दल…
-
कथित पक्षांतराच्या चर्चेनंतर पंकजा मुंडे यांनी मंगळवारी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन मजकुरासोबत भाजप पक्षचिन्ह कमळाचे चित्र त्यांच्या समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आले. यातून पक्षांतराच्या चच्रेला यामुळे पूर्णविराम मिळेल का? हे मात्र १२ डिसेंबर नंतरच कळणार आहे. 'मी पक्ष सोडणार नाही. बंडखोरी माझ्या रक्तात नाही,' अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली आहे.
-
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे मागील बऱ्याच काळापासून राज्यातील भाजपा नेतृत्वावर नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर न केल्याने खडसेंनी नाराजी व्यक्त केली होती. "४० वर्ष प्रामाणिकपणे काम करुनही आपल्याला असं का वागवण्यात आलं याबाबत मी विचारणार आहे. माझा काय गुन्हा आहे ते तरी सांगावं असं म्हटलं होते. तसेच तीन वर्ष मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आल्याची खंतही त्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. वेळोवेळी खडसे भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका करताना दिसले होते. खडसेंऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले होते. मात्र रोहिणी यांना निवडणुकीमध्ये पराभव झाला.
-
विधानसभा निडवणुकीच्या तिकीटवाटपामध्ये भाजपाने बोरिवलीतील तत्कालीन आमदार असणाऱ्या विनोद तावडेंना तिकीट नाकारले होते. भाजपने ४ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या ७ उमेदवारांच्या यादीमध्ये तावडेंचे नवा नव्हते तेव्हाच त्यांना तिकीट मिळणार नाही हे उघड झालं होतं. तावडेंऐवजी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले होते. त्यानंतर तावडेंनी ‘आधी देश, मग पक्ष आणि मग आपण या तत्वानुसार आम्ही चालतो. पक्ष दणदणीत मताधित्याने निवडून येणार,’ असा विश्वास व्यक्त केला होता. तसंच तिकीट का मिळालं नाही याबद्दल अमित भाई आणि पक्ष श्रेष्ठींशी भविष्यात नक्कीच चर्चा करेन असंही तावडे म्हणाले होते.
-
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपाने मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिलं. पाठीत खंजीर खुपसला तरी चालेल पण भाजपाचा विजय असो, अशा शब्दांत कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र कुलकर्णी या तिकीट कापण्याच्या पक्षाच्या निर्णयामुळे नाराज असल्याचे समजते.
-
माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हेही पक्षावर नाराज असल्याचे समजते. दोन वर्षांपूर्वी ताडदेव येथील एम पी मिल झोपू प्रकल्पासह इतर प्रकल्पांमध्ये विकासकांना मदत केल्याप्रकरणी मेहता यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले. मेहता यांच्या विरोधात विरोधकांकडून दररोज नवनवीन आरोप करण्यात येत असल्याने त्याचा सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत मेहता यांना पाठीशी घालणे भाजपाला कठीण गेले आणि पक्षाने त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्या. त्यामुळेच मेहता नाराज असल्याचे समजते.
-
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात झालेल्या नेत्याच्या प्रचंड इनकमिंगमुळे भाजपातील अनेक निष्ठावंताची उमेदवारी गेली. यात खडसे, तावडेंपासून ते अनेक विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळ ठेवले आणि शेवटपर्यंत त्यांना तिकीट दिलेच नाही. त्यामुळेच बावनकुळे पक्षावर नाराज असल्याचे समजते. बावनकुळे यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्याचा भाजपचा निर्णय पक्षाच्या पूर्व विदर्भातील कामगिरीवर प्रतिकूल परिणाम करणारा ठरला. मतदानापूर्वी पक्षाने केलेले ‘डॅमेज कंट्रोल’ फारसे उपयोगी पडले नाही. बावनकुळे यांची ओळख विदर्भातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक अशी आहे. जिल्हा परिषद सदस्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द कामठी विधानसभा मतदारसंघातून सुरू झाली व त्यानंतर सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पक्षाची सत्ता आल्यावर त्यांना ऊर्जा हे महत्त्वाचे खाते मिळाले होते. मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा जाहीरपणे केले होते.

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…