-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. मात्र या मंत्र्यांच्या यादीमध्ये एक नाव खास होते. ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे. ‘मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ म्हणत वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
सत्तेच्या प्रवाहापासून दूर राहुन महाराष्ट्राचं राजकारण आणि सत्ता चालवणाऱ्या ठाकरे कुटुंबानं यावेळी सक्रिय राजकारणात उडी घेतली. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे बरोबरच उद्धव ठाकरेही सत्तेत सहभागी झाले आणि मुख्यमंत्रीही बनले. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणार आहे. बाप मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री असं चित्र महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. मात्र अशाप्रकारे वडील मुख्यमंत्री असताना मुलाने मंत्री होण्याची देशातील पहिलीच वेळ नाही. याआधी पाच वेळा असं घडलं आहे. जाणून घेऊयात अशाच काही पिता-पुत्रांच्या जोड्या…
-
देशाचे सहावे उप-पंतप्रधान ठरलेल्या हरियाणाच्या चौधरी देवी लाल यांनी १९८९ मध्ये उप-पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवले होते. १९७७ ते १९७९ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ते १९८७ ते १९८९ दरम्यान दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
-
देवी लाल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली तेव्हा त्यांचे पुत्र रणजित सिंह चौटाला यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. रणजित सिंह यांच्याकडे कृषिमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
-
तामिळनाडूमधील 'द्रमुक'चे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी आणि त्यांचे पुत्र स्टॅलिन हे एकाच वेळी मंत्रीमंडळामध्ये होते. २००६ ते २०११ कालावधीमध्ये 'द्रमुक' आणि मित्रपक्षांचे सरकार सत्तेत असताना करुणानिधी मुख्यमंत्री होते.
-
करुणानिधी यांच्या मंत्रीमंडळामध्ये स्टॅलिन हे पहिल्या तीन वर्षांसाठी ग्रामविकास आणि पंचायत राजचे काम पाहत होते. २००९ साली त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री करण्यात आलं.
-
पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. २००९ साली प्रकाश सिंह यांचे पुत्र सुखबीर सिंह यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
२०१२ च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिरोमणी अकाली दलची सत्ता आल्यानंतर प्रकाश सिंह बादल हे मुख्यमंत्री झाले. तर सुखबीर सिंह सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
-
२०१४ साली आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पार्टीची (टीडीपी) सत्ता आली. त्यानंतर टीडीपीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २०१७ साली नायडू यांनी स्वत:च्या मुलाला म्हणजेच नारा लोकेश यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं.
-
नारा लोकेश यांना विधानसपरिषदेवर घेऊन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. विधानसभेमध्ये निवडून आलेले नसतानाही नारा यांची मंत्रीपदी वर्णी लागली. त्यांना माहिती तंत्रज्ञान, पंचायत राज आणि ग्रामविकास या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती.
-
२०१४ साली निर्मिती झालेल्या तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले ते तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) सर्वेसर्वा असणारे के. चंद्रशेखर राव.
-
राव यांच्या मंत्रीमंडळामध्ये त्यांचे पुत्र के. टी. रामा राव यांनाही मंत्रीपद मिळाले. रामा राव यांच्याकडे राज्याच्या महिती तंत्रज्ञान आणि पंचायत राजची जबाबदारी देण्यात आली.

पितृपक्षात ‘या’ राशींना मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद! अफाट पैसा, धनसंपत्ती अन् मोठं यश, तर ‘या’ राशींच्या नशिबी संकट…