-
दिल्लीकर मतदारांनी भाजपचा ध्रुवीकरणाचा प्रयत्न फोल ठरवत आम आदमी पक्षाच्या (आप) विकासाच्या धोरणाला एकतर्फी कौल दिला. लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मते देणाऱ्या दिल्लीने विधानसभेत मात्र सलग तिसऱ्यांदा ‘आप’ला निवडून दिले. ‘आप’च्या या लाटेत भाजपचा धुव्वा उडाला आणि काँग्रेसच्या हाती पुन्हा भोपळा आला.
-
‘पाच साल अच्छे बितें, लगे रहो केजरीवाल’ हा ‘आप’चा नारा मंगळवारी ‘पाच साल फिर केजरीवाल’ असा झाला! दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या विकासाला मतदारांनी पुन्हा कौल दिला. ‘आप’च्या या ऐतिहासिक विजयामागे प्रमुख सात कारणे सांगितली जातात.
-
विकास : शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील काम मतदारांनी वाखाणले. दोन्ही क्षेत्रांसाठी निधीची तरतूद वाढवली. शिक्षणाचा दर्जा सुधारला. मोहल्ला क्लिनिक उघडून गरिबांना उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. वीज-पाणी मोफत देण्याची सोय केली.
-
पर्याय कोण? : भाजपकडे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नाही असा प्रचार ‘आप’ने अखेपर्यंत केला. दिल्लीतील भाजपच्या सात खासदारांचे फोटो असलेले फलक लावण्यात आले आणि केजरीवाल यांच्यासमोर भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा पर्याय कोणता असा सवाल विचारला गेला. प्रचार संपण्याच्या एक दिवस आधीही केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार भाजपने जाहीर करावा, असे आव्हान अमित शहा यांना दिले.
-
सौम्य हिंदुत्व : हनुमान चालिसा म्हणून आपण हिंदू आहोत पण, धर्माध नाही हे दाखवण्यात केजरीवाल यशस्वी झाले. त्यांनी शाहीन बागला ना उघड विरोध केला ना पाठिंबा दिला. जाहीरनाम्यामध्ये राष्ट्रवादाचा मुद्दाही उचलून धरला. शाळांमध्ये देशभक्तीला चालना देणारे कार्यक्रम आखले जाणार आहेत. भाजपचे कडवे हिंदुत्व मान्य नसलेल्या हिंदूंची मते ‘आप’ला मिळवता आली.
-
मुस्लिमांचा पाठिंबा : दिल्लीत १२ टक्के मुस्लीम मतदार आहेत. भाजपच्या कडव्या धर्मांध प्रचारामुळे मुस्लिमांनी ‘आप’ला मते दिली. मुस्लीमबहुल मतदारसंघात ‘आप’चे उमेदवार निवडून आले. काँग्रेसचा नाकर्तेपणा ‘आप’च्या पथ्यावर पडला.
-
भाजपची वैयक्तिक टीका : भाजपच्या नेत्यांनी केजरीवाल यांची दहशतवादी म्हणून हेटाळणी केली. त्याला केजरीवाल यांनी भावनिक उत्तर दिले. सरकारी नोकरी केली. परदेशात गेलो नाही, असे सांगत मध्यमवर्गाला आकर्षित केले. मी दहशतवादी असेन तर भाजपला मत द्या, असेही आवाहन केजरीवाल यांनी केले. केजरीवाल यांच्यावरील वैयक्तिक टीकेचा भाजपलाच फटका बसला.
-
महिलांची मते : महिलांसाठी बसप्रवास मोफत केला. शहरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले. त्यातून महिलांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला. मुस्लीम महिलांनीही आपला मतदान केले.
-
भाषेवर नियंत्रण : दीड महिन्याच्या निवडणूक प्रचारात केजरीवाल यांचे एकदाही भाषेवरील नियंत्रण सुटले नाही. त्यांनी भाजपच्या आव्हानालाही शांतपणे उत्तरे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापासून केजरीवाल जाणीवपूर्वक लांब राहिले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार स्थानिक मुद्दय़ांपेक्षा भारत-पाकिस्तान तसेच हिंदू-मुस्लीम असा ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. त्यात भाजप नेत्यांनी प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्ये केली. निवडणूक आयोगाला अनुराग ठाकूर व परवेश वर्मा यांच्यावर कारवाई करावी लागली.
-
दहशतवादी, देशद्रोही अशा आरोपांच्या फैरी झेलणारे ‘आप’चे प्रमुख अरिवद केजरीवाल यांनी निवडणुकीचा प्रचार स्थानिक मुद्दय़ांवरच केंद्रित ठेवला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी दिल्लीकर मतदारांचे केजरीवाल यांनी आभार मानले. शाळा, मोहल्ला क्लिनिक, चोवीस तास वीज-पाणी या मूलभूत गरजा लोकांसाठी महत्त्वाच्या असून त्याला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोठा संदेश दिला आहे, असे केजरीवाल प्रचंड जनसमुदायाला अभिवादन करताना म्हणाले. केजरीवाल यांनी अप्रत्यक्षपणे वादग्रस्त आणि प्रक्षोभक भाषण करणाऱ्या भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले.

दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग