-
भारतात येण्यासाठी ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून सोमवारी म्हणजेच २७ जुलै रोजी उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने आज म्हणजेच बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील.
-
राफेल विमानांचे काही फोटो भारतीय हवाई दलाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये विमानांमध्ये हवेत असतानाच ३० हजार फुटांवर इंधन भरण्यात आल्याचे दिसत आहे. (Photo : Twitter/IAF_MCC)
-
ब्रिटिश तंत्रज्ञ सर अॅलन कोभम यांनी १९३०-४० च्या दशकात ग्रॅपल्ड-लाइन नावाची हवेत विमानातून विमानात इंधन भरण्याची पद्धत विकसित केली. मात्र अशा प्रकारे उडत्या विमानात इंधन भरणे खूपच जिकिरीचे होते. त्यातून अधिक सुधारित प्रोब अँड ड्रोग पद्धत आकारास आली. त्यामध्ये इंधन घेऊन जाणारे मोठे विमान (टँकर) हवाई पेट्रोल पंपासारखे काम करते. (Photo : Twitter/IAF_MCC)
-
ज्यामध्ये इंधन भरायचे ते लढाऊ विमान (रिसिव्हर) टँकरच्या मागे जवळ येते. दोन्ही विमानांच्या वेग आणि अंतराचा समन्वय साधून टँकरमधून होज-पाइप बाहेर सोडला जातो. त्याला हवेत स्थिर करण्यासाठी नरसाळ्याच्या (फनेल) आकाराचे ड्रोग बसवलेले असते. त्याचे टोक रिसिव्हर विमानावरील नळीच्या आकाराच्या प्रोब किंवा बूमला मिळते. त्यानंतर व्हॉल्व उघडून टँकरमधून रिसिव्हर विमानात इंधन भरले जाते. (Photo : Twitter/IAF_MCC)
-
हवेत इंधन भरण्याची फ्लाइंग बूम नावाची पद्धतही अस्तित्वात आहे. त्यात टँकर विमानातून लांबीला विस्तारणाऱ्या दुर्बिणीच्या रचनेप्रमाणे टेलिस्किोपिक बूम बाहेर येतो. त्याने रिसिव्हर विमानात इंधन भरले जाते. (Photo : Twitter/IAF_MCC)
-
फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन २७ जुलै रोजी बहुचर्चित राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीने भारतात येण्यासाठी उड्डाण केले आहे. फ्रान्स ते भारत या ७ हजार किलोमीटरच्या प्रवासात ही विमाने फक्त यूएईमधील फ्रेंच एअर बेसवर एकदा लँडिंग करतील. फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात येत आहेत.
-
या विमानांनी फ्रान्समधून उड्डाण करण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय राजदूतांनी तिथे जाऊन भारतीय वैमानिकांची भेट घेतली. “डासू कंपनीने वेळेवर या विमानांची डिलिव्हरी केल्याबद्दल तसेच फ्रेंच एअरफोर्स आणि तिथल्या सरकारचे आभार मानले. ही विमाने भारतात घेऊन येणे, ही भारतीय वैमानिकांसाठी अभिमानाची बाब असून ते उड्डाणासाठी प्रचंड उत्सुक्त आहेत. राफेलमुळे भारताची हवाई शक्ती कैकपटीने वाढणार आहे” असे भारतीय राजदूतांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
-
भारतामध्ये ही विमाने हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर उतरतील. तोच या राफेल विमानांचा तळ असेल. २०१६ साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे.
-
उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात येईल असे आधीच सांगण्यात आलं होतं. तसेच अंबालामध्ये येण्यापूर्वी ही विमाने यूएईमधील फ्रेंच तळावर लँडींग करतील.
-
राफेल विमाने आज सकाळी अकराच्या सुमारास दुबई विमानतळावरुन उड्डाण करतील आणि दुपारी दोनपर्यंत भारतामध्ये लॅण्ड करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
-
भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाहीय.

दुर्गा मातेला सर्वात जास्त प्रिय आहेत ५ राशी; नवरात्रीमध्ये पूर्ण होईल त्यांची प्रत्येक इच्छा; तुमची रास यात आहे का?