-
राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत असून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आहेत. मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा, राणा दांपत्य अटक, किरीट सोमय्यांवरील हल्ला अशा अनेक मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक असून राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी करत आहेत. विरोधकांच्या या मागणीचा शरद पवारांनी समाचार घेतला असून सत्ता मिळत नाही म्हणून इतक अस्वस्थ होऊ नये असा सल्ला दिला आहे.
-
शरद पवारांनी पुण्यात बोलताना १९८० मध्ये आपलं सरकार बर्खास्त झाल्यानंतरची एक आठवणदेखील सांगितली आहे.
-
“एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. पण त्या भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात,” असं सांगत शरद पवारांनी यावेळी राणा दांपत्यावर निशाणा साधला.
-
“महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असून मला त्याचं आश्चर्य वाटतं,” असं शरद पवार म्हणाले.
-
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी राज्यात अनेक वर्ष काम केलं. बाळासाहेब ठाकरे आणि आमचे इतके जाहीर मतभेद असायचे की एकमेकांबद्दल शब्द वापरताना आम्ही कधी काटकसर केली नाही. पण ही बैठक संपल्यानंतर संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या घऱी असायचो”.
-
“अनेक वेळा औरंगाबादला सभेत आम्ही विरोधकांवर तुटून पडायचो. पण नंतर ज्येष्ठ नेते बापूसाहेब काळदाते, अनंतराव भालेराव यांच्यासोबत नंतरची संध्याकाळ जायची. तेव्हा सभेत बोलल्या गेलेल्या गोष्टींचे स्मरणही आम्ही करत नसू. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांपासून राजकारणाची ही संस्कृती महाराष्ट्रात होती. मात्र आता दुर्दैवाने ती हरवत चालली आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
-
“महाराष्ट्राच्या विधीमंडळात यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना अनेकदाआचार्य अत्रे, एस. एम. जोशी यांची चर्चा अत्यंत टोकाची असायची. पण चर्चा संपल्यानंतर एकत्र बसून राज्याच्या हिताचा विचार करायचे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण दुर्दैवाने अलीकडे नको त्या गोष्टी पहायला मिळत आहेत,” अशी खंत शरद पवारांनी बोलून दाखवली.
-
“मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेत वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री म्हणजे एक संस्था आहे. या संस्थेचा वकूब कायम ठेवण्याची गरज आहे. पण ते न ठेवण्याची भूमिका काहीजण घेतात,” अशी खंतही शरद पवारांनी बोलून दाखवली.
-
“तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करु शकता. पण माझ्या दारात येऊन करतो म्हटल्यावर त्यामुळे माझ्याबद्दल आस्था असणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली तर दोष देता येणार नाही,” असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली.
-
“अलीकडे या पद्धतीची भूमिका काहीजण मांडत आहे. पण लवकरच हे सर्व शांत होईल अशी आशा करुयात. आम्हा लोकांची भूमिका मतभेद कसा वाढणार नाही आणि राज्याची जुनी परंपरा आहे ती कशी कायम राहील याची काळजी घेण्याचा प्रयत्न असेल,” असं शरद पवारांनी म्हटलं.
-
“सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळे काय माझ्यासारखे नसतात,” असं म्हणत शरद पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
-
“सत्ता येते आणि जाते…पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचं कारण नाही,” असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
-
“सध्या काही लोक फार अस्वस्थ आहेत. पण त्यांना दोष देता येऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणार अशा घोषणा त्यांनी केल्या. पण ते घडू शकलं नाही याची अस्वस्थता असते,” असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.
-
“पण या सगळ्यांना काय परिणाम होतात हे लक्षात येईल आणि योग्य वातावरण निर्माण करण्यास सहकार्य लागेल अशी अपेक्षा करुयात,” असंही शरद पवार म्हणाले
-
दरम्यान १९८० मधील आठवण सांगताना म्हणाले की, “१९८० मध्ये माझं सरकार बर्खास्त केलं. रात्री १२.३० वाजता मुख्य सचिवांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर तीन चार मित्रांना बोलावलं आणि घरातल सामान हलवलं”. (File Photo: Sharad Pawar Twitter)
-
शरद पवार सकाळी ७ वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो, सरकारी गाडी सोडली. (Express Archieve)
-
“त्यादिवशी इंग्लंड आणि भारताचा सामना होता. १० वाजता वानखेडेवर सामना पाहण्यासाठी गेलो आणि दिवसभर सामन्याचा आनंद लुटला,” असं शरद पवारांनी सांगितलं. (File Photo: PTI)
-
“अस्वस्थ असलेले लोक कोणते मार्ग खुले आहेत या खोलात जाणार आणि त्याचा फार विचार करण्याची गरज नाही. राष्ट्रपती राजवट लावण्याच्या चर्चा केल्या जातात, दमदाटी केली जाते पण त्याचा काही परिणाम होत नाही. निवडणुका लागल्या तर निकाल काय लागतात हे कोल्हापूरने सांगितलं आहे. त्यामुळे कोणी त्या टोकाला जाईल असं वाटत नाही,” असं शरद पवार म्हणाले.
-
(File Photos: Twitter/PTI/Express Achieve)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”