-
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे राज्य सरकार कोसळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
-
भाजपासोबत सरकार स्थापन करावं असा प्रस्ताव देखील एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे महाराष्ट्रासोबतच दिल्लीमधील घडामोडींना देखील वेग आला आहे.
-
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत पहिली प्रतिक्रिया देताना या प्रश्नावर चर्चेमधून तोडगा निघू शकतं असं म्हटलं आहे.
-
हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही शरद पवार यांनी म्टलं आहे.
-
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असून एकनाथ शिंदेंचा प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून त्यांच्याकडून आमच्याशी संपर्क साधण्यास आसल्यास चर्चा करु, असंही पवार म्हणाले आहेत.
-
सायंकाळी मुंबईमध्ये बैठक होईल अशी शक्यताही पवारांनी व्यक्त केली आहे.
-
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत असणाऱ्या शरद पवार यांनी आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली.
-
यावेळी त्यांना पत्रकारांनी एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या कथित बंडासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारण्यात आले.
-
या प्रश्नांवर बोलताना पवारांनी, मविआ सरकार बनण्यापूर्वी अशाप्रकारची बंडाळी झाली होती याची आठवण करुन देताना, ‘यामधून काही नाही काही रस्ता निघेल याची मला खात्री आहे,’ असं उत्तर दिलं.
-
पुढे बोलताना शरद पवारांनी, या सरकारमधील मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणि इतर पदं काँग्रेसकडे आहेत, असं सांगितलं.
-
“मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे. त्यामुळे त्यांचे पक्ष प्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयामागे आम्ही असू,” असं सांगत शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात ढकलला.
-
शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासंदर्भातील निर्णय घ्यावा असं सूचित करतानाच दुसरीकडे सध्या राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे.
-
सध्या निर्माण झालेल्या या राजकीय पेचामधून मार्ग निघेल याची नक्की खात्री असल्याचं पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये दोन ते तीन वेळा अधोरेखित केलं.
-
यावेळेस तुम्हाला सरकार वाचवता येईल का?, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला.
-
यावर उत्तर देताना, “सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहाता यातून काही ना काही मार्ग निघेल, असा मला विश्वास आहे,” असं पवार म्हणाले.
-
“आत्तापर्यंत शिंदेंनी आम्हाला किंवा इतर कुणाला त्यांचा प्रस्ताव सांगितला नाही. पण तिन्ही पक्षांमधल्या चर्चेनुसार मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. त्यात बदल करणं हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. त्यासंदर्भात शिवसेनेचं नेतृत्व जे काही निर्णय घेईल, त्यात आम्ही असू. पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात बदल करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
-
२०१९ साली राज्यात सरकार स्थापन होण्याच्या वेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपासोबत गेला होता.
-
त्यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतली होती. त्यामुळे आताच्या राजकीय पेचप्रसंगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुढे काय करणार? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
-
पत्रकार परिषदेत माध्यमांनी याचसंदर्भातून विचारणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला असता पवारांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
-
“काहीतरी व्यवस्थित प्रश्न तरी विचारा. काहीही प्रश्न विचाराल का? राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबतच का जाईल? विरोधात देखील बसू शकते”, असं म्हणत पवारांनी ही शक्यता फेटाळली.
-
तसेच, हाच प्रश्न पत्रकारांनी पुन्हा विचारला असता त्यावर फक्त हसून पवारांनी उत्तर देणं टाळल्यामुळे यासंदर्भातल्या चर्चांना अजूनच उधाण आलं आहे.
-
विधान परिषदेमध्ये झालेल्या क्रॉस व्होटिंगसंदर्भात बोलताना शरद पवारांनी, क्रॉस व्होटिंग होऊनही सरकार चालतं हा ५० वर्षांचा अनुभव आहे, असं उत्तर दिलं.
-
एकनाथ शिंदेंच्या कथित बंडामुळे सरकार अस्थिर होणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी व्यक्त केलाय. (सर्व फाइल फोटो)
