-
शिंदे सरकारने ‘मेट्रो ३’ची कारशेड कांजूर मार्ग ऐवजी आरे वसाहत परिसरात उभारण्याची घोषणा केल्यानंतर आज (सोमवार) सकाळी आरेतील रस्ते २४ तासांसाठी बंद करण्यात आले आणि त्यानंतर तत्काळ या परिसरातील रस्त्यांवरील झाडांची छाटणी सुरू झाली.
-
‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) दोन डबे लवकरच मुंबईत दाखल होत असून ते मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये नेण्यात येणार आहेत.
-
त्यासाठी ही छाटणी करण्यात येत असल्याचे समजते. मात्र वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
-
मरोळ आणि गोरेगाव येथून आरे परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक सोमवारी सकाळी बंद करण्यात आली.
-
आरे परिसरातून धावणाऱ्या बेस्ट बसचे मार्गही वळविण्यात आले.
-
हे रस्ते २४ तास वाहतुकीसाठी बंद करून झाडांची छाटणी करण्यास सुरुवात करण्यात आली. याविषयी माहिती देण्यास एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला
-
पण या कामामुळे ‘आरे वाचवा’ चळवळीतील आंदोलक कमालीचे संतप्त झाले आहेत.
-
सकाळपासून सुरू असलेल्या कामाविषयी चौकशी करण्यासाठी जाणाऱ्या पर्यावरणप्रेमींना हुसकावून लावण्यात येत आहे.
-
राज्य सरकारने ‘मेट्रो ३’ची कारशेड आरेमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आरेतील कामावरील बंदीही उठविण्यात आली आहे.
-
यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘मेट्रो ३’च्या कामाला गती दिली आहे.
-
तसेच आंध्र प्रदेशमधील श्रीसिटी येथील कारखान्यातून मेट्रो गाडी मुंबईत आणण्यात येत आहे.
-
गाडीचे आठपैकी दोन डबे सहा-सात दिवसांपूर्वी श्रीसिटी येथून रस्ते मार्गे रवाना झाले आहेत.
-
येत्या आठ-दहा दिवसांमध्ये हे डबे मुंबईत दाखल होणार असून ते मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये नेण्यात येणार आहेत.
-
मोठाल्या ट्रेलरवरून हे डबे आणण्यात येत आहेत. रस्त्यांवरील झाडांचा डब्यांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वृक्ष छाटणी करण्यात येत असल्याचे समजते.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय