-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गद्दार असून त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे याला आपल्या कपाळावर ‘माझा बाप गद्दार आहे’, असे लिहावे लागेल, अशी टीका उबाठा गटाच्या नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी एका प्रचार सभेत केली.
-
या टीकेनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. उबाठा गटाने प्रियांका चतुर्वेदी यांच्या विधानाची पाठराखण केली आहे.
-
तर शिंदे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या की, प्रिय चतुरताई तुम्ही खासदारकी (राज्यसभेचं सदस्यत्व) कशी मिळवली ते लोकांना एकदा सांगितलं पाहिजे. कारण मराठीचा कसलाही गंध नसताना, कुठलंही कर्तृत्व नसताना, शिवसेनेसी काडीमात्र संबंध नसताना, तुम्ही खासदारकी कशी मिळवली हे लोकांना समजलं पाहिजे.
-
आता खासदारकीची टर्म (राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी) संपत आल्यावर तुमची तडफड तुमच्या वक्तव्यांमधून दिसत आहे, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली.
-
शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही प्रियांका चतुर्वेदींना लक्ष्य केले. चतुर्वेदींना राज्यसभेची खासदारकी का दिली? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मी फक्त ते जाहीरपणे बोलू शकत नाही. कारण त्या महिला आहेत. त्यांच्याबद्दल जाहीरपणे माहिती उघड करणे, योग्य होणार नाही.
-
शिंदे गटाच्या टीकेमुळे प्रियांका चुतर्वेदी यांच्या खासदारकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही काळातच त्यांना राज्यसभेवर नियुक्त केले गेले होते.
-
प्रियांका चतुर्वेदी या अपघाताने राजकारणात आल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. १९७९ साली त्यांचा मुंबईतच जन्म झाला होता. प्रोफेशनल पीआर म्हणून काम करणाऱ्या प्रियांका सामाजिक कार्यातून पुढे स्तंभलेखिका आणि नंतर राजकारणात आल्या.
-
राजकारणात येण्यापूर्वी प्रियांका चतुर्वेदी एका मीडिया कंपनीत संचालक म्हणून काम करत होत्या. ब्लॉग लिहून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीनंतर २०१० साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
-
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय प्रवक्तेपदापर्यंत मजल मारली होती. मात्र २०१९ साली पक्षात मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला आणि त्याच वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा महाराष्ट्रात नुकतेच मविआचे सरकार स्थापन झाले होते.
-
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २०२० साली त्यांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली गेली. एका वर्षात थेट राज्यसभा मिळाल्यामुळे त्यावेळीही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

सुरक्षा रक्षकांना आता ‘खाकी वर्दी’, शासनाची मान्यता; महाराष्ट्रात १ मेपासून…