-
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सोमवारी राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीश बीआर गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
-
सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. दिल्लीतील मयूर विहार येथे राहणारे वकील राकेश किशोर सुनावणी सुरू असताना न्यायाधीशांसमोर गेले. त्यांनी बूट काढून न्यायाधीशांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला.
-
न्यायालयात हजर असलेल्या सुरक्षारक्षकांनी तात्काळ हा हल्ला रोखला. यानंतर त्यांना ताब्यात घेत न्यायालयाच्या बाहेर नेले. त्यादरम्यान, या वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेंगे’, अशी घोषणा दिली. -
-
अलीकडेच विष्णू मंदिरासंदर्भातील एका प्रकरणाची सुनावणी करत असताना सरन्यायाधीश गवई याचिकाकर्त्याला म्हणाले होते की “तुमची तक्रार असेल तर तुम्ही भगवान विष्णूकडे जा.” त्यावर काही लोकांनी, हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत सरन्यायाधीशांवर टीका केली होती. ज्यानंतर ही घटना घडली.
-
वकील सरन्यायाधीशांच्या दिशेने धावून गेला आणि तो पायातला बूट काढू लागला. त्याचवेळी न्यायालयातील सुरक्षारक्षक त्याच्या दिशेने धावले. तो वकील बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावणार इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि न्यायालयाबाहेर नेलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
-
वकिलाने घातलेल्या या गोंधळानंतरही सरन्यायाधीशांनी न्यायालयाचं कामकाज थांबू दिलं नाही. त्यांनी कार्यवाही चालू ठेवण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, “हे सगळं पाहून कोणीही विचलित होऊ नका. मी देखील विचलित झालो नाही. अशा घटनांनी मला काहीच फरक पडत नाही.”
-
न्यायमूर्ती गवई १६ मार्च १९८५ रोजी बार कौन्सिलमध्ये सामील झाले आणि १९८७ पर्यंत माजी महाधिवक्ता आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजा एस. भोसले यांच्याबरोबर त्यांनी काम केले. १९९० नंतर त्यांनी प्रामुख्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर संवैधानिक आणि प्रशासकीय कायद्यात प्रॅक्टिस केली. ते नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील देखील होते.
-
राकेश कुमार यांनी जेव्हा सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्याबाबत एका वकिलाने सांगितलं की सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर काही सेकंदांसाठी बूट फेकणारे वकील काही वेळ तिथेच उभे होते. नंतर त्यांना बाहेर नेण्यात आलं. अशी ही घटना सर्वोच्च न्यायलयात घडली.

Rakesh Kishore Reaction: CJI B. R. Gavai यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “दैवी शक्तीमुळे हे कृत्य केले”