-
२५ जून २०२५ हा दिवस भारताच्या अंतराळ इतिहासात एक सुवर्ण अध्याय म्हणून नोंदवला गेला आहे. ४१ वर्षांनंतर पुन्हा एकदा एक भारतीय अंतराळात गेला आहे. ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय वायूदलातील ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी नासाच्या (अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था) फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून ‘ॲक्सिऑम-४’ या अंतराळ मोहीमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केलं आहे. (PC : axiomspace.com)
-
‘ॲक्सिऑम-४’ मोहिमेचा भाग म्हणून शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) जाणारे पहिले भारतीय बनणार आहेत. या मोहिमेमुळे देशवासीयांना अभिमान तर वाटू लागला आहेच, पण भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाला ( ह्युमन स्पेस प्रोग्राम) एक नवीन दिशा मिळाली आहे. या कार्यक्रमाची पहिली पायरी चढलेल्या शुभांशू शुक्लांबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? (PC : axiomspace.com)
-
शुभांशू शुक्लांचे शिक्षण आणि करिअर
शुभांशू शुक्ला यांचा जन्म उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण अलीगंज येथील सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून पूर्ण केले. प्राथमिक शाळेत शिकत असल्यापासून त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गोडी लागली. म्हणूनच त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धापासून प्रेरित होऊन यूपीएससी एनडीए परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून संगणक विज्ञान विषयात बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी प्राप्त केली. (PC : axiomspace.com) -
भारतीय हवाई दलात प्रवेश
शुभांशू शुक्ला यांना २००६ मध्ये भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आले. ते हवाई दलातील अनुभवी पायलट आहेत. त्यांच्याकडे जवळजवळ २००० तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी Su-३० MKI, MiG-२१, MiG-२९, Jaguar, Hawk, Dornier 228 आणि An-32 सारखी विविध प्रकारची विमाने उडवली आहेत. (PC: axiomspace.com) -
अंतराळवीर बनण्याचा प्रवास
शुभांशू शुक्ला यांनी २०१९ मध्ये ह्युमन स्पेस प्रोग्रामसाठी निवड प्रक्रियेत भाग घेतला. त्यानंतर, ते रशियाला गेले आणि २०२० मध्ये इतर चार अंतराळवीरांसह तेथील युरी गागारिन कॉसमोनॉट प्रशिक्षण केंद्रात त्यांनी मूलभूत प्रशिक्षण घेतले. त्यांचे प्रशिक्षण २०२१ मध्ये पूर्ण झाले आणि ते भारतीय अंतराळवीर संघाचा भाग बनले. (PC: axiomspace.com) -
ॲक्सिऑम-४ मोहीम आणि आंतरराष्ट्रीय मान्यता
शुभांशू शुक्ला यांनी ॲक्सिऑम-४ मोहीमेचा भाग म्हणून त्यांचा अंतराळ प्रवास सुरू केला आहे. या मोहिमेचा उद्देश आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाला एका नवीन उंचीवर नेणे असा आहे. शुक्ला यांच्याआधी राकेश शर्मा (१९८४) अंतराळात गेले होते. शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. भारतीय हवाई दलानेही शुभांशू शुक्ला यांच्या या मोहिमेवर आनंद व्यक्त केला आहे आणि देशाचा अभिमान वाढवला आहे. (PC : axiom.space/instagram) -
ॲक्सिऑम-४ मोहीम एक आंतरराष्ट्रीय सहकार्य आहे ज्यामध्ये नासा, स्पेसएक्स आणि इस्रो एकत्र काम करत आहेत. शुभांशू हे या मोहिमेत पायलटच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत कमांडर पेगी विटसन आणि मिशन स्पेशालिस्ट स्लाव्होस उझनान्स्की आणि टिबोर कापू अंतराळात आहेत. (PC : axiomspace.com)
-
वैयक्तिक जीवन आणि आवडी
शुभांशू शुक्लांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे डॉ. कामना मिश्रा यांच्याशी लग्न झालं आहे. त्या दंतवैद्य आहेत आणि शालेय जीवनापासून शुभांशू यांच्या जोडीदार आहेत. त्यांना एक मुलगा देखील आहे. त्यांचे वडील शंभू दयाळ शुक्ला हे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत आणि आई आशा शुक्ला गृहिणी आहेत. शुभांशू शुक्लांना दोन मोठ्या बहिणी आहेत, त्यापैकी एक एमबीए आहे आणि दुसरी शिक्षिका आहे. (PC : axiomspace.com) -
व्यस्त जीवन असूनही, शुभांशू शुक्ला शारीरिक व्यायामात (जिम) रस घेतात, विज्ञानाशी संबंधित पुस्तके वाचतात आणि अलिकडेच त्यांना ज्योतिषशास्त्रात रस निर्माण झाला आहे. त्यांना खगोल छायाचित्रणाचीही आवड आहे. (PC : axiomspace.com)
-
शुभांशू शुक्ला यांचे योगदान
शुभांशू शुक्ला यांचे हे अभियान केवळ त्यांची वैयक्तिक कामगिरी नव्हे तर भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमातील एक मैलाचा दगड आहे. त्यांच्या मोहिमेदरम्यान त्यांनी म्हटलं की हा प्रवास केवळ त्यांचा नाही तर ह्युमन स्पेस प्रोग्रामची सुरुवात आहे. (PC : axiomspace.com) -
या ऐतिहासिक प्रवासाने, शुभांशू शुक्ला यांनी केवळ भारताला गौरव मिळवून दिला नाही तर अंतराळ क्षेत्रात भारताचा वाढता प्रभाव देखील दाखवून दिला आहे. त्यांचे हे अभियान भारतीय अंतराळ कार्यक्रमाला एक नवीन दिशा देण्यासह पुढील पिढ्यांना त्यांची स्वप्ने अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रेरणा देईल. (PC : axiomspace.com)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”