-
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला अहमदाबाद येथून सुरूवात झाली. ट्रम्प यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी मेलेनिया, कन्या इव्हान्का व जावई जॅरेड कुशनर हेही भारतात दाखल झाले आहेत. इव्हान्का व जॅरेड कुशनर यांचा उच्चस्तरीय शिष्टमंडळात समावेश केलेला असून, कुशनर हे ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार आहेत. ट्रम्प यांच्याप्रमाणेच त्यांची कन्या इव्हान्का यांनीही कर्तृत्वाच्या बळावर आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्याविषयीची खास माहिती. (Photo : instagram/ivankatrump)
-
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर २०१६मध्ये रिपब्लिकनांच्या प्रायमरीला सुरुवात झाली आणि इव्हान्का ट्रम्प खऱ्या अर्थानं चर्चेत आल्या. त्यांची ही लोकप्रियता आजवर टिकून आहे. इव्हान्का यांची आई म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली पत्नी इव्हाना या मॉडेल होत्या. इव्हान्का केवळ दहा वर्षांची असताना डोनाल्ड आणि इव्हाना यांचा घटस्फोट झाला.
-
इव्हान्का यांनी शिक्षण घेत असतानाच इंग्लिशसह फ्रेंच भाषेवरही प्रभुत्व मिळवले. पुढे अर्थशास्त्राची पदवी घेतली. आईप्रमाणेच इव्हान्का यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगनेच केली. इव्हान्का यांनी अनेक प्रसिद्ध उत्पादनांसाठी जाहिराती केल्या. या काळात त्या काही मासिकांच्या मुखपृष्ठावरही त्या झळकल्या.
-
शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मॅनहॅटनमध्ये स्वतःचे रिटेल स्टोअर सुरू केले. नंतर वारशानं चालत आलेल्या कुटुंबातील उद्योग-व्यवसायात सहभाग घेतला. ‘ट्रम्प ऑर्गनायझेशन’च्या संचालक मंडळावर त्यांची निवड करण्यात आली. पुढे फॅशन क्षेत्रात नाव कमावत त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली.
-
कपडे, हँडबॅग्ज, पादत्राणे, दागिने यांची स्वतंत्रपणे निर्मिती करणाऱ्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं. आजच्या घडीला त्यांची उत्पादने अमेरिकेतील मोठ्या दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. अर्थात, डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच त्याही वादग्रस्त ठरल्या आहेत. अन्य डिझायनरच्या कपड्यांची नक्कल करण्याचे आरोप त्यांच्यावर झाले. त्याचबरोबर उत्पादनांमध्ये सशाच्या कातडीचा वापर केल्याचा आरोप ‘पेटा’ने केला होता.
-
उत्पादनांच्या दर्जाबाबतही टीका करण्यात आली होती. ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणार हे निश्चित झाल्यावर इव्हान्का यांनी ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मदत केली. अध्यक्षपदाचा शपथविधी झाल्यावर त्या पती जेरेड कुशनेर यांच्यासमवेत वॉशिंग्टन डी. सी. येथे वास्तव्यास आल्या.
-
कुशनेर यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागारपदावर नियुक्ती करण्यात आली. उद्योग-व्यवसायाची पार्श्वभूमी असलेल्या ३८ वर्षांच्या इव्हान्का यांचा प्रवास डोळ्यात भरणारा आहे. विशेषतः ट्रम्प यांच्या सल्लागारांच्या अंतर्गत वर्तुळात प्रवेश केल्यावर तो अधिक आकर्षक बनला आहे.
-
व्हाइट हाउसमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये आधुनिक, स्वयंपूर्ण स्त्रीबद्दल त्यांनी आस्था व्यक्त केली होती. ‘समान काम, समान वेतना’साठी इव्हान्का यांनी भूमिका आग्रही घेतली होती, परंतु ट्रम्प प्रशासनाने समान वेतनाचा प्रस्ताव धुडकाविल्यावर त्यांनी प्रशासनाच्या बाजूनेच निर्णय दिला.
-
इव्हान्का यांची प्रत्येक भूमिका स्वतःच्या व्यवसायासाठी पूरक असते, अशी टीकाही त्यांच्यावर होते. स्त्रियांच्या प्रश्नांप्रमाणेच स्थलांतर, आरोग्य, पर्यावरण, समलिंगी आणि तृतीयपंथीयांचे हक्क अशा विषयांवरही त्यांची स्वतःची मतं आहेत, त्या वेळोवेळी मांडत असतात.
-
‘फॉक्स अँड फ्रेंड्स’ या टीव्हीवरील कार्यक्रमात आपण या विषयांवर काम करू, असे त्या सांगतात. मात्र, अशी उदाहरणे फार कमी आहेत.
-
राजकीय अथवा अन्य प्रश्नांवर जाहिररीत्या मते व्यक्त करण्यास त्या फारशा उत्सुक नसतात. ट्रम्प प्रशासन आणि आपल्या भूमिकेमध्ये संघर्ष होऊ नये, याची खबरदारी त्या घेतांना दिसतात.
-
प्रशासकीय निर्णय घेतले जात असताना आपले मुद्दे ट्रम्प यांच्या विरोधात असले, तरी आपण ते जोरकसपणे मांडतो आणि त्याचा ट्रम्प यांच्यावर निश्चितच परिणाम होत असतो, असे त्या म्हणतात; परंतु समलिंगी किंवा तृतीयपंथीयांच्या हक्कांच्या समर्थनार्थ त्यांनी केलेल्या ट्विट्चा ट्रम्प यांच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसला नाही.
-
पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याच्या निर्णयालाही त्या विरोध करू शकल्या नाहीत. ट्रम्प आपले कन्याप्रेम नेहमी उघडपणे व्यक्त करतात. त्यांच्या निर्णयांना अथवा ट्विटरवरील त्यांच्या क्षोभक टीकांना इव्हान्का यांनाही जबाबदार धरावे का, असा प्रश्न एकदा हिलरी क्लिंटन यांनी विचारला होता.
-
अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सन हिने इव्हान्कांना ‘पळपुटी’ असे संबोधले होतं. त्यावर त्यांनी विवेकी आणि विचारी उत्तर दिलं होतं. ‘काही लोक माझ्याकडून अवास्तव अपेक्षा करीत आहेत. अमेरिकी नागरिकांनी ज्या कारणांसाठी माझ्या पित्याला मतदान केले, ती तत्त्वे आणि तो कार्यक्रमच ते केवळ माझ्यासाठी बासनात बांधून ठेवतील. एवढा माझा प्रभाव आहे, असे त्यांना वाटते. ते होणार नाही. माझ्या वडिलांना उदारमतवादी बनविण्याचा त्यांच्या टीकाकारांचा प्रयत्न आहे; परंतु ते काम मी करावे, अशी त्यांची इच्छा असेल, तर मी त्यात अपयशी ठरीन,’ असं इव्हान्का म्हणाल्या होत्या.
-
इव्हान्का यांचं नाव अमेरिकेच्या उद्योगक्षेत्रात आघाडीवर आहे आणि स्वयंपूर्ण, करिअरिस्ट स्त्री अशी त्यांची प्रतिमा आहे. ट्रम्प यांच्या उद्योगविषयक सल्लागार आहेत. एक व्यक्ती म्हणून त्यांची स्वतंत्र मते असली, तरी त्या भांडवलशाही समाजाच्या प्रतिनिधीही आहेत. तब्बल दोन वर्षांपूर्वी इव्हान्का भारत दौऱ्यावर आल्या होत्या. हैदराबाद येथे झालेल्या परिषदेला त्यांनी हजेरी लावली होती.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…