-
राजकारणी माणूस म्हणजे त्या त्या काळातील राजकीय, सामाजिक सांस्कृतिक संस्कृतीचा साक्षीदारच. राजकारणाबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सगळ्याचं क्षेत्रांशी ही माणसं जोडलेली असतात. राजकारणात असल्यानं भोवताली गर्दीचा गराडा कायम असतोच, पण तितकंच त्यांच्याकडं इतिहासात नोंदल्या गेलेल्या गोष्टींचं भांडारही असतंच. एखाद्या वेळी या गोष्टी व्यक्त करण्याची संधी मिळाली की मग लोकांपर्यंत पोहोचतात. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या बालपणापासून ते आयुष्यात घडलेल्या महत्त्वाच्या आठवणींना एकदा उजाळा दिला होता. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. त्या गप्पांमधील काही घटनांवर राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं टाकलेला प्रकाशझोत. Photo : instagram/mns_adhikrut/
-
राज ठाकरे यांचा मुलाखतीचा कार्यक्रम झाला. त्यात त्यांनी वेगवेगळ्या क्षणांना आणि व्यक्तींना पुन्हा जिवंत केलं होतं. राज यांना मुलाखतीमध्ये शालेय आयुष्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. ‘शाळेत असताना तुमचा बराचसा वेळ बाहेरचे उद्योग करण्यात जायचा?,' असा प्रश्न मुलाखतकारानं विचारल्यानंतर राज यांनी लगेच चिमटीत पकडत ‘बाहेरचे उद्योग म्हणजे काय हे समजून सांगा,’ असं विचारलं अन् सभागृहात खसखस पिकली होती. ‘बाहेरचे उद्योग म्हणजे बाई तुम्हाला बऱ्याचदा वर्गाबाहेरच ठेवायच्या असं म्हणायचं आहे,’ असं मुलाखतकार अंबरीश मिश्र यांनी स्पष्ट केलं.
-
‘मॅट्रिकला असताना तुम्हाला प्रत्येक विषयात ३५ मार्क असं काहीतरी आम्ही ऐकलयं,’ असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी थेट दहावीच्या वर्गातील आठवणीनी सांगितल्या होत्या. “दहावीला मला ३७ टक्के होते. त्यामुळेच बोर्डात पहिला क्रमांक आलेल्या, दुसरा क्रमांक आलेल्या आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार करायला मी जातच नाही."
-
"नाही म्हणजे कुठल्या तोंडाने जायचं असा प्रश्न पडतो. एकदाच मी असा सत्कार केला होता. तेव्हा भाषणात मी लोकशाही याला म्हणतात असं सांगितलं होतं. ज्याला बोर्डात ३७ टक्के पडलेत तो बोर्डात आलेल्याचा सत्कार करतोय याला लोकशाही म्हणतात असं मी म्हणालो होतो,” अशी आठवण राज यांनी सांगितली होती.
-
भारतीय राजकारणामधील घराणेशाहीबद्दल बोलताना राज ठाकरे भूमिका मांडली होती. “कुठलीही गोष्ट लादून होत नसते. उद्या मी माझ्या मुलाला राजकारणात आणलं किंवा इतर कोणी त्यांच्या मुलाला वा मुलीला आणलं. तरी जनताच केवळ त्यांना राजकारणात आणू शकते. कारण स्वीकारायचं की नाही हे जनतेवर असतं,” असं राज म्हणाले होते.
-
सिनेमाविषयी बोलताना राज ठाकरे यांनी त्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. "महात्मा गांधी यांच्या आयुष्यावरील गांधी चित्रपट मला प्रचंड आवडतो. एकदा ‘प्लाझा’ला मी गांधी चित्रपट पहायला गेलो होतो. तो चित्रपट पाहिल्यावर मी भारावून गेलो. मी इतका भारावलो होतो की, त्यानंतर मी गांधी हा विषय वाचायला घेतला. तो चित्रपट मी प्लाझा थिअटरला ३० ते ३२ वेळा पाहिला असेल. गांधी चित्रपट तुम्ही जितक्या वेळा पहाल तितक्या वेळेला तो तुम्हाला नवीन सांगतो. तो तुम्हाला चित्रपटाचं टेक्निक सांगतो. एका माणसाचं आयुष्य तीन तासांमध्ये जगाला सांगण सोप्पी गोष्ट नाही,” असं राज ठाकरे म्हणाले होते.
-
गांधी चित्रपटाच्या प्रभावातूनच छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचा विचार राज यांनी केला होता. “मी कॉलेजला असताना गांधी सिनेमा पाहिला. गांधी पाहिल्यानंतर माझं एक स्वप्न आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांवर एक चित्रपट करावा."
-
"कॉलेजमध्ये असल्यापासूनचं चित्रपट निर्मिती, चित्रपट दिग्दर्शन हेच माझं पहिलं प्रेम होतं. खरंतर मी अॅनिमेशन चित्रपट करावा. वॉल्ट डिज्ने स्टुडिओमध्ये जाऊन अॅनिमेटर म्हणून चित्रपट करावा अशी माझी इच्छा होती. पण त्यावेळेला आतासारखी माध्यमे नव्हती. कोणाला पत्र लिहायचं कोणाशी बोलायचं. काय करायचं काहीच माहिती नव्हतं."
-
"गांधी पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवायचा, असं वाटलं आणि त्यानंतर मी महाराज पण वाचायला सुरुवात केली. महाराजांवर खूप वाचलं. बरंच वाचल्यानंतर महाराजांवर चित्रपट होऊ शकत नाही, हे माझ्या लक्षात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवला तर जितका भालजींनी केला तेवढचं तुम्ही चित्रपटामध्ये दाखवू शकता. तीन तासांमध्ये महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे इतर जे कंगोरे आहेत, ते तुम्ही दाखवू शकत नाही. शिवाजी महाराज एक व्यक्ती म्हणून लोकांसमोर आणताना फक्त अफझलखान, शाहिस्तेखान, आग्र्याहून सुटका आणि पन्हाळ गडावरुन वेढा तोडून बाहेर पडणं या चार घटनांपुरते मर्यादित नाही."
-
"शिवाजी महाराजांना आपण फक्त या चार घटनांवर बघतो. या चार घटनांच्या व्यतिरिक्त त्यांचे परराष्ट्र धोरण कसं होतं. त्यांनी स्वत: मराठी भाषा कोष निर्माण केला. स्वत:चं चलन निर्माण केलं. मंत्रिमंडळाची निर्मिती केली. हे असं सर्व तीन तासांमध्ये दाखवणं शक्य नाही," असं राज ठाकरे यांनी विशेषत्वानं नमूद केलं होतं.
-
राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाजारांवरील चित्रपट बनवताना, इतर गोष्टी सांगताना महाराजांनी राज्य कारभाराची घडी नीट बसावी म्हणून तयार केलेलं मंत्रिमंडळ, जहागिऱ्यांचा उल्लेख केला होता. “महाराजांनी त्यांचे मंत्रिमंडळ उभारलं. आपण आज जे चिटणीस, सरचिटणीस, पंतप्रधान, सरदेशमुख हे सगळे शब्द वापरतो ते महाराजांच्या काळातील आहेत,” असं सांगत राज यांनी या पदांकडेही लक्ष वेधलं होतं.
-
मुलाखतकारांनी जहागिऱ्यांच्या यादीमध्ये ‘फडणवीस’ असा उल्लेख केला. त्यानंतर राज यांनी चेहऱ्यावर प्रश्नार्थक हावभाव करुन ‘फडणवीस महाराजांच्या काळात’ असं म्हणत क्षणभर थांबले. “फडणवीस हे महाराजांच्या नंतरच्या काळातील साडेतीन शहाण्यांपैकी एक होते,” असं म्हणाले होते. राज यांच्या या उत्तरानं अवघ्या सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाटासह हशा पिकला होता.
-
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाविषयीही राज यांना त्यावेळी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज म्हणाले, "शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ ला लागला. त्यावेळी मी तिसरी चौथीत होतो. तेव्हा मला कांजण्या झाल्या होत्या. तेव्हा माझे वडील मार्मिकला परिक्षण लिहायचे. शब्दनिशाद नावानं. त्यासाठी त्यांना शुक्रवारी चित्रपट पाहायला लागायचा. मात्र तो काही कारणानं राहून गेला आणि मी ही तो पाहिला नाही."
-
त्याला जोडूनच राज यांनी नंतर दोन वर्षांनी घडलेला एक प्रसंग सांगितला. "दोन वर्षानंतर पाण्याचं उकळतं भांड माझ्या अंगावर पडल्यानं मी भाजलो होतो. जवळजवळ सहा ते सात महिने मी घरी होतो. पण ज्यावेळी माझ्या अंगावर भांड पडून मला भाजलं, तेव्हा आईनं रडत बाळासाहेबांना फोन केला. बाळासाहेब लगेच टॅक्सीनं मला भेटायला आले होते. आईनं फोन केल्यानंतर बाळासाहेब होते, त्या कपड्यांवर म्हणजेच लुंगी आणि बनियानवर मला भेटायला आले होते,” अशी बाळासाहेबांबद्दलची खास आठवण राज यांनी या मुलाखतीत सांगितली होती.
-
“याच काळात रेकॉर्डेड एलपी यायच्या. अशीच एक शोले चित्रपटातील डायलॉगची एलपी बाळासाहेबांनी मला दिली होती. त्यानंतर पुढील काही महिन्यांमध्ये मला शोले चित्रपट संपूर्ण पाठ झाला. शोले चित्रपट १९७५ ला प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास पाच वर्षांनी म्हणजेच १९८० साली आई मला तो चित्रपट पाहण्यासाठी थिअटरमध्ये घेऊन गेली होती. थिअटरमध्ये जसा तो चित्रपट सुरु झाला, तसा मी तो चित्रपट बोलत होतो. संपूर्ण चित्रपट बोललो. न पाहता संपूर्ण डायलॉग पाठ असलेला तो एकमेव चित्रपट होता,” असा भन्नाट किस्सा राज यांनी सांगितला.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल