-
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी गेले ३ महिने संपूर्ण देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात पुणे शहराला करोना विषाणूचा चांगलाच फटका बसला. लॉकडाउन काळात अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींना आपले जॉब गमवावे लागले. पुण्यात एमबीएचं शिक्षण घेतलेल्या प्रिया शिरसकर या तरुणीने संकटासमोर हार न मानता, लढण्याचं ठरवलं. गेले काही दिवस प्रिया घरात केक तयार करुन विकते आहे, तिच्या या छोट्याश्या प्रयत्नामुळे घर चालवण्याच चांगला हातभार लागतो आहे. (सर्व छायाचित्र – सागर कासार)
-
प्रिया पुण्यातील एका ऑफिसमध्ये कामाला होती. आजारपणात प्रियाच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कायमचं अंधत्व आलं. त्यामुळे आईची काळजी घेण्यासाठी आणि घराकडे लक्ष देण्यासाठी प्रियाने घरी थांबण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान प्रियाने बेकरी प्रोडक्ट्स बनवण्याचा कोर्स केला. ते शिक्षण प्रियाला आता आपलं घर चालवण्यास उपयोगी ठरतं आहे.
-
प्रियाचा भाऊ एका मॉलमध्ये तर तिचे वडिल एका कार्यालयात काम करत होते. लॉकडाउनमुळे त्यांनाही आपली नोकरी गमवावी लागली. अखेरीस प्रियाने पुढे येत केकचा व्यवसाय करण्याचं ठरवलं.
-
सुरुवातीला कप केक, चॉकलेट केक अशा छोट्या-छोट्या ऑर्डर प्रियाला मिळत गेल्या. अनेकदा मोठा केक तयार करण्यासाठी ओव्हन नसल्यामुळे मिळेल त्या साधनाचा वापर करत प्रियाने आपल्या ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण केल्या आहेत.
-
प्रियाच्या या कामाबद्दल समजताच आजुबाजूच्या परिसरातून तिला अधिक ऑर्डर मिळाल्या, यातून मिळालेल्या पैशांमधून तिने ओव्हन मागवलं.
-
गेल्या महिन्याभरात प्रियाने १५० पेक्षा जास्त केक आपल्या ग्राहकांना पुरवले आहेत. या कामात आपले वडिल, भाऊ या सर्वांची मदत होत असल्याचं प्रियाने सांगितलं.
-
सध्या करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत, प्रिया स्वच्छतेचे सर्व निकष पाळत हे केक तयार करते. संकटकाळातही हार न मानता परिस्थितीशी लढण्यासाठी प्रियाने स्विकारलेला हा 'गोड' मार्ग प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल असा आहे.

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल