चंद्रपूर : लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून चंद्रपूर महापालिकेने 'शाळा बंद, शिक्षण सुरु' हा अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिकवत आहेत. (फोटो सौजन्य – श्याम देवलकर, शिक्षक) जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात त्यामुळे त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोन असेलच असे नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. शहरात महापालिकेच्या पहिली ते दहावी पर्यंतच्या २९ शाळा असून २,४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ७४ शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. या सर्व ७४ शिक्षकांनी दररोज दहा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षणाचे धडे द्यायचे आहेत. एखाद्या प्रभागात जर आठ ते दहा विद्यार्थी जवळ राहात असतील तर त्यांना एकत्र एकाच घरी आणून तिथेच त्यांचा वर्ग घ्यायचा आहे. आठवडाभरापासून हा उपक्रम महापालिकेचे शिक्षण राबवित आहेत. दहा विद्यार्थ्यांचा ४५ मिनिटं वर्ग घ्यायचा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरे दहा विद्यार्थी. हा वर्ग घेतांना विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी गृहपाठ तथा इतर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सूचना द्यायची. या उपक्रमाला विद्यार्थी व पालक यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी व शिक्षक मास्क लावून, सॅनिटायझरने हात स्वच्छ करून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुस्तके मोफत देण्यात आलेली आहेत.

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त