-
देवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये रविवारी निसर्गाचा पुन्हा एकदा प्रकोप झाला. चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळल्यानं हाहाकार उडाला. या भयंकर दुर्घटनेत १२५ हून अधिक मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत १० मृतदेह सापडले असून, इतरांचा शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. (Photo/ITBP)
-
हिमकडा कोसळल्याने आलेल्या प्रलयात अलकनंदा नदीवरील जलविद्युत केंद्रे आणि ऋषीगंगा नदीवरील लघू जलविद्युत प्रकल्प वाहून गेले. (Photo/SDRF)
-
नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळल्यानंतर धौलीगंगा, ऋषीगंगा आणि अलकनंदा या गंगेच्या उपनद्यांना रविवारी दुपारी महापूर आला. त्यामुळे नदीकाठच्या भागात हाहाकार उडाला. त्याचबरोबर प्रलयामुळे ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’चा (एनटीपीसी) धौलीगंगा नदीवरील तपोवन-विष्णूगड जलविद्युत प्रकल्प आणि ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. (Photo/ITBP)
-
ऋषीगंगा नदीवरील एक लघू जलविद्युत प्रकल्पही वाहून गेल्याची माहिती इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली. ही घटना घडल्यानंतर तातडीनं मदत व बचाव कार्य हाती घेण्यात आलं. (Photo/SDRF)
-
महापूर आला तेव्हा या प्रकल्पांवर काम करणारे मजूर बोगद्यांमध्ये होते. त्यापैकी १२५जण अद्याप बेपत्ता आहेत. तपोवन प्रकल्पाच्या बोगद्यामधून १६ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. (Photo/ITBP)
-
आतापर्यंत १० मृतदेह सापडले असून १२५ मजूरांचा थांग लागत नसल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिली. (Photo/SDRF)
-
इंडो-तिबेट पोलीस दलाचे जवान, राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कराच्या सहा तुकड्या बचावकार्य करीत आहेत. तर तीन हेलिकॉप्टरद्वारे दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत असून पूरग्रस्त भागांतील अनेक खेड्यांमध्ये मदतकार्य सुरू आहे. (Photo/ITBP)
-
हिमकडा कोसळल्यानंतर सुरू झालेल्या प्रलयाची माहिती कळाल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली. स्थानिक यंत्रणांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. त्याचबरोबर एसडीआरएफच्या जवानांनाही पाचारण करण्यात आलं. (Photo/SDRF)
-
नदीकाठावरील गावांमध्ये नद्यांचं पाणी शिरल्यानं अनेकजण अडकून पडले. या नागरिकांना हवाई मदतीद्वारे सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. (Photo/IAF)
-
हिमकडा तुटल्यानंतर आलेल्या जलप्रलयाबरोबर मातीचा भरावही सगळीकडे पसरला. त्यामुळे अनेक ठिकाणी मदत मोहीम राबवताना जवानांना अडचणींचा सामना करावा लागत होता. (Photo/SDRF)
-
बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी श्वानांची मदत घेण्यात आली. (Photo/NDRF Director-General SN Pradhan)
-
दुर्घटनेनंतर सुरू झालेलं मदत व बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. (Photo/NDRF Director-General SN Pradhan)
-
या महाप्रलयात संपूर्ण एक छोटा जलविद्युत प्रकल्पच वाहून गेल्याचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले. ‘एनटीपीसी’ प्रकल्पाचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या भागातील घरेही वाहून गेली आहेत. त्याचबरोबर सीमा भागातील छावण्यांशी संपर्क तुटला आहे, असे इंडो-तिबेट पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. (Photo/SDRF)
-
धौलीगंगा या गंगेच्या उपनदीला आलेल्या पुराचे पाणी दोन ते तीन मीटर उंचीवरून वाहत होते. पावरी, टिहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार, देहरादून या भागांना महापुराचा फटका बसला आहे. नदी काठावरील अनेक खेड्यांतील लोकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Photo/NDRF Director-General SN Pradhan)
-
पौरी, टेहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार आणि देहरादून या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे असून गंगेच्या काठावरील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) बचावकार्य करीत आहे. (Photo/IAF)
-
लष्कराचे ४०० जवान घटनास्थळी मदतकार्य करत असून, दौन वैद्यकीय पथकेही पाठविण्यात आली आहेत. लष्कराचे अभियांत्रिकी कृती दलही घटनास्थळी तैनात करण्यात आलेले आहेत. (Photo/SDRF)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग