-
भारताला करोना कालावधीमध्ये रशियाने पाठवलेल्या मदतीची पहिली खेप आज (२९ एप्रिल २०२१ रोजी) दिल्ली विमानतळावर दाखल झाली. पहाटेच्या सुमारास हे विमान दिल्ली विमानतळावर उतरलं.
-
दिल्ली विमानतळावरील कस्टम विभागातील कर्मचारी या विमानाला सुरक्षित पद्धतीने उतरवून कोणत्याही अडथळ्याशिवाय यामधील सामान तातडीने उपलब्ध करुन देता यावं म्हणून दिवस रात्र काम करत आहेत.
-
रशियाने पाठवलेल्या मदतीमध्ये २० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, ७५ व्हेंटिलेटर्स आणि १५० बेडसाईड मॉनेटर्स या उपकरणांचा समावेश आहे.
-
त्याचप्रमाणे रशियाने पाठवलेल्या या मदतीमध्ये औषधांचाही समावेश असून याचं एकूण वजन २२ मेट्रीकटन इतकं असल्याचं केंद्रीय अप्रत्यक्ष कर विभागाने स्पष्ट केल्याचं एएनआयने म्हटलं आहे.
-
तर दुसरीकडे अमेरिकेने भारताला देऊ केलेली आप्तकालीन करोना मदतीची पहिला खेप आज पाठवण्यात येत आहे. अमेरिकेतील ट्रॅव्हिस हवाई तळावरुन करोना काळात उपयोगी पडणारी यंत्रसामुग्री आणि सामान घेऊन येणारं विमान दिल्ली विमानतळावर उतरणार आहे.
-
अमेरिकेने ४४० ऑक्सिजन सिलेंडर्स, रेग्युलेटर्स पाठवल्याचं अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय घडामोडीसंदर्भातील विभागाने म्हटलं आहे.
-
या मदतीशिवाय अमेरिकेकडून ९ लाख ६० हजार रॅपीड टेस्टींग किट्स पाठवले जाणार असून याची मदत करोनाच्या वेगाने चाचण्या करुन प्रादुर्भाव रोखण्यासाठी होईल. त्याचप्रमाणे अमेरिका एक लाख एन९५ मास्कही पाठवणार असून हे मास्क आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्यांना वितरित केले जातील असं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे.
-
भारताला शक्य ती सर्व मदत करण्याची आम्ही बांधील आहोत. भारतातील पहिल्या फळीत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आमचा पाठिंबा आहे असंही अमेरिकेने म्हटलं आहे.
-
कालच (२८ एप्रिल २०२१ रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर पंतप्रधानांनी ट्विटरवरून पुतिन यांचे आभार मानले आहेत. तसेच, दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी मंत्री स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी बुधवारी संध्याकाळी ट्विटर हँडलवरून व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. “आज माझे मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी उत्तम संभाषण झालं. आम्ही कोविड-१९ च्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. करोनाच्या साथीविरोधात भारताच्या सुरू असलेल्या लढ्याला मदत केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानतो”, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.
-
आम्हाला गरज असताना भारताने मदत केली आहे त्यामुळे आता करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संकटात असताना आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर दिले. (सर्व फोटो : एएनआय आणि रॉयटर्सवरुन साभार)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”