-
राज्यात लॉकडाउन असल्याने काही प्रमाणात करोना रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. मात्र, असलं तरी दररोज दाखल होणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. ( All photographs by Arul Horizon/Indian express)
-
सर्वोच्च न्यायालयातही हा मुद्दा गाजत असून, केंद्र सरकारने राज्यांना आणि विविध शहरांना रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात ११ मे रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर रेल्वे स्थानकानामध्ये मालवाहतूक करणार्या रेल्वेतून तब्बल चार टँकरद्वारे ५५ मॅट्रिक टन ऑक्सिजन दाखल झाला.
-
राज्याच्या अनेक भागात करोनाबाधित रुग्णांवर उपचारादरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मिळावा, या करिता विविध कंपन्या, संस्था, संघटना त्यांच्या परीने पुढे येऊन मदत करताना दिसत आहे.
-
तरीही ऑक्सिजन तुटवड्यावर मात करता आलेली नाही. आणखी काही रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने, त्यांना बरे होण्यास उशीर लागत आहे. तर काहींना ऑक्सिजन वेळेत उपलब्ध न झाल्याने प्राण देखील गमवावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
-
यावर प्रशासनाकडून विशेष उपाय योजना करण्यात आल्या असून, राज्यातील इतर भागांप्रमाणे पुण्यात देखील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता. ओरिसा येथून सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने मालवाहतूक रेल्वेतून ऑक्सिजन टँकर रवाना झाले होते. ( All photographs by Arul Horizon/Indian express)
-
नागपूर स्टेशन येथे ६ वाजण्याच्या सुमारास दाखल होताच. तिथे अगदी काही मिनिटं थांबवून, क्रू बदलून पुण्याच्या दिशेने गाडी रवाना झाली. ही विशेष सेवा असल्याने ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेला होता. त्यामुळे ओरिसा येथील अंगुल ते लोणी काळभोर १७२५ किलोमीटरचे अंतर ३७ तासांत पूर्ण केले आहे.
-
आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रासाठी पाच ऑक्सिजन एक्स्प्रेस धावल्या आहेत. तर पुणे विभागासाठी ही पहिलीच अशा प्रकारची रेल्वे ठरली आहे.
-
पुण्यात कमी वेळेत ऑक्सिजन टँकर पोहोचल्याने रेल्वे विभागाचे विशेष कौतुक केले जात आहे. तर रेल्वे परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
-
देशातील विविध भागात दररोज ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत. कधी कुठे टँकर वेळेत पोहोचत नाहीये, तर कधी कधी रस्ता चुकल्यानं विलंब होऊन रुग्णालयांमध्ये मृत्यूचं तांडव बघायला मिळत आहे.
-
ऑक्सिजनअभावी होत असलेले मृत्यू आणि रस्त्याने ऑक्सिजनची वाहतूक करण्यास लागत असणारा विलंब यामुळे रेल्वेची रो रो सेवा सुरू करण्यात आली आहे. ( All photographs by Arul Horizon/Indian express)
-
करोनाच्या प्रसाराला नियंत्रणात आणण्यासाठी सध्या पुणे शहर आणि जिल्ह्यात लॉकडाउन आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्यानं ऑक्सिजनची मागणीही वाढलेली आहे.
-
पुणे शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात बाधित वाढत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
-
सर्वाधिक रुग्ण असलेल्या २६६ ग्रामपंचायत, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये दक्षतेचा इशारा देऊन संबंधित गावे घोषित केली आहेत.
-
जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ३८४१ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू, तर दोन लाख १४ हजार १६१ रुग्ण बाधित आढळले आहेत.
-
दक्षतेचा इशारा घोषित केलेल्यांमध्ये १४३ गावे, १३ नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींचा समावेश आहे. तसेच १०७ गावांत इशारा देण्यात आला आहे. ( All photographs by Arul Horizon/Indian express)
-
दक्षतेचा इशारा दिलेल्या गावांमध्ये हवेली, खेड, जुन्नर, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि शिरूर तालुक्यातील नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
-
नगरपालिका – बारामती, भोर, दौंड, इंदापूर, जुन्नर, चाकण, आळंदी, राजगुरूनगर, लोणावळा, तळेगाव दाभाडे, जेजुरी, सासवड आणि शिरूर. नगरपंचायत – माळेगाव, देहू, वडगाव. याशिवाय शिरूर तालुक्यातील २० गावांचा, हवेलीतील १९ गावांचा, खेडमधील १६, मुळशी १४, जुन्नर १३, बारामती ११, आंबेगाव आणि इंदापूर प्रत्येकी दहा, पुरंदर आणि दौंड प्रत्येकी नऊ, भोर सहा, मावळ पाच आणि वेल्ह््यामधील एका गावाचा समावेश आहे.
-
पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात २ हजार ४०४ करोनाबाधित रुग्ण आढळले. नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या ४ लाख ५० हजार १३३ इतकी झाली आहे.
-
दिवसभरात शहरात ५२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत पुणे शहरात ७ हजार ४६१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर उपचार घेत असलेल्या ३ हजार ४८६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
-
सध्या पुण्यातील प्रमुख रुग्णालयांसह इतर रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढीबरोबरच ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे रुग्णालयांकडून होत असलेल्या मागणीने प्रशासनावर ऑक्सिजन पुरवठ्याचा ताण येत होता. आता पुण्यात रेल्वेनं ऑक्सिजन पुरवला जाणार असल्यानं प्रशासनानं सुटकेचा निश्वास टाकला आहे. ( All photographs by Arul Horizon/Indian express) —

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक