-
शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी सोमवारी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला. यासोबतच वसीम रिझवी यांचं नवं नाव आता जितेंद्र नारायण सिंह त्यागी झालं आहे.
-
उत्तर प्रदेशात योगी सरकार सत्तेत आल्यापासून वसीम रिझवी वारंवार चर्चेत राहिले आहेत. त्यांनी देशातील नऊ मशिदींना हिंदूंकडे सोपवण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. कुतूब मिनार परिसरात असणारी मशीद भारताच्या भूमीवरील ठपका असल्याचंही ते म्हणाले होते. दरम्यान यानिमित्ताने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारणारे वसीम रिझवी नेमके कोण आहेत हे जाणून घेऊयात.
-
हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या वसीम रिझवी यांचा जन्म शिया मुस्लीम कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेल्वे कर्मचारी होते. वसीम रिझवी सहावीत असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर वसीम रिझवी आणि त्यांच्या बहिण-भावांची जबाबदारी आईवर आली होती.
-
वसीम रिझवी भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. १२ वी नंतर ते सौदी अरबला एका हॉटेलमध्ये काम करण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी जपान आणि अमेरिकेतही काम केलं.
-
कौटुंबिक कारणांमुळे वसीम रिझवी लखनऊला परत आले आणि आपलं काम सुरु केलं. यानंतर त्यांचे अनेकांशी चांगले संबंध निर्माण झाले.
-
या काळात त्यांनी पालिका निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि येथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
-
यानंतर वसीम रिझवी शिया मौलाना कल्बे जव्वाद यांच्या जवळ आले आणि शिया वक्फ बोर्डाचे सदस्य झाले.
-
वसीम रिझवी यांची दोन लग्नं झाली असून दोन्ही पत्नी लखनऊत आहेत. पहिल्या पत्नीपासून त्यांनी तीन मुलं आहेत, ज्यामध्ये दोन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुलांची लग्नं झाली आहेत.
-
२००३ मध्ये उत्तर प्रदेशात मुलायम सिंह मुख्यमंत्री झाल्यानंतर वक्त मंत्री आझम खान यांच्या शिफारशीनुसार मुख्तार अनीस यांना शिया सेंट्रल वक्त बोर्डाचं चेअरमन करण्यात आलं. मात्र एका वादामुळे त्यांना पायऊतार व्हावं लागलं आणि २००४ मध्ये कल्बे जव्वाद यांच्या शिफारशीनुसार वसीम रिझवी यांना चेअरमन करण्यात आलं.
-
२००७ मध्ये मायावती यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर वसीम रिझवी यांनी समाजवादी पक्षाची साथ सोडत बसपामध्ये प्रवेश केला.
-
२००९ मध्ये त्यांनी शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचा कार्यकाळ पूर्ण केला. यानंतर नव्याने बोर्ड गठीत करण्यात आला असता कल्बे जव्वाद यांच्या सहमतीने त्यांच्या नातेवाईकाला चेअरमन करण्यात आलं. वसीम रिझवी यांना यावेळी सदस्य बनवण्यात आलं. येथूनच कल्बे जव्वाद आणि वसीम रिझवी यांच्यातील वर्चस्वाची लढाई सुरु झाली.
-
२०१० मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर जमालुद्दीन अकबर यांना चेअरमनपद सोडावं लागलं आणि वसीम रिझवी पुन्हा चेअरमन झाले.
-
२०१४ मध्ये आझम खान यांच्यामुळे ते पुन्हा चेअरमनपदी विराजमान झाले. यावेळी कल्बे जव्वाद यांनी सपा सरकारविरोधात मोर्चा काढला होता.
-
वसीम रिझवी यांच्यावर अनेक वक्फ संपत्तीच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला, ज्यासंबंधी अनेक एफआयआरही दाखल झाले. योगी सरकारने कल्बे जव्वाद यांच्या प्रभावामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे. पाच जिल्ह्यांमध्ये जमीन घोटाळा केल्याच्या आरोपाखाली वसीम रिझवी यांच्यासहित ११ जणांवर गुन्हा दाखल आहे.
-
वसीम रिझवी यांनी मदरशांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणाचा संबंध दहशतवादाशी जोडला होता.
-
कुराणमधील २६ आयाती हटवण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर त्यांच्याविरोधात फतवा काढत इस्लाममधून बाहेर काढण्यात आलं होतं.
-
वसीम रिझवी यांनी इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांच्यावर आधारित एक पुस्तक लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या लिखाणावरुन खूप टीका झाली आहे. इतकंच नाही तर वसीम रिझवी यांनी इस्लाममध्ये सुधार करण्याची मागणीदेखील केली होती.
-
फक्त मुस्लिम नाही, तर त्यांचे कुटुंबीयही विरोधात गेले होते. त्यांच्या आई आणि भावाने नातं तोडलं होतं.
-
यादरम्यान सोमवारी नरसिंहानंद यांच्या उपस्थिती वसीम रिझवी यांना हिंदू धर्मात प्रवेश केला. यानंतर जितेंद्र त्यागी म्हणजेच वसीम रिझवी मंदिरात दिसले. येथे त्यांच्या गळ्यात भगवा कपडा दिसत होता. तसंच हात जोडून देवाचा पूजा करत होते.
-
इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर बोलताना जितेंद्र नारायण सिंह त्यागी (वसीम रिझवी) यांनी म्हटलं की, “येथे धर्मांतराचा काही मुद्दा नाही, मला इस्लाममधून काढण्यात आलं असताना कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा हा माझा हक्क आणि इच्छा आहे. सनातन जगातील सर्वात पहिला धर्म असून जितक्या चांगल्या गोष्टी येथे आहेत तितक्या कोणत्या धर्मात नाहीत. जुम्माला नमाज पठण केल्यानंतर शिर कापण्यासाठी फतवे काढले जात असताना अशा परिस्थिती कोणी आम्हाला मुसलमान म्हणणं याच्याने आम्हालाच लाज वाटते”.
-
दरम्यान अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी वसीम रिझवी यांचं स्वागत केलं असून त्यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. वसीम रिझवी आता हिंदू झाले असून त्यांच्याविरोधात फतवा काढण्याची हिंमत कोणी करु नये असं सांगताना त्यांनी केंद्राकडे त्यांना योग्य सुरक्षा देण्याची मागणी केली. आहे.

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case