-
गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिंदे गट आणि भाजपातील स्थानिक पातळीवरील वाद समोर आल्यानंतर या युतीत आलबेल नसल्याच्या चर्चा होत होत्या. त्यातच, शिंदे गटाच्या हितचिंतकाने दोन दिवसांपूर्वी केलेल्या जाहिरातीमुळे दोन्ही पक्षातील नेते एकमेकांविरोधात भिडले होते. परंतु, या वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर एकत्र आले.
-
पालघरमध्ये आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर होते. या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे अशी चर्चा असतानाच दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसले.
-
दोघांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा सुरू होती, हे कळलं नसलं तरीही दोघांच्या चेहऱ्यावरील भाव हास्याचे असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये सारंकाही आलबेल असल्याचं सध्याचं चित्र आहे.
-
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवरही आज टीप्पणी केली.
-
“माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाही. गेल्या १५-२० वर्षांपासून दोस्ती आहे. ही दोस्ती जिवाभावाची मैत्री आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
-
“आमच्या दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नही. तुटणार नाही. कितीही प्रयत्न केला तरी. काही म्हणतात जय विरू की जोडी, काहीजण धरम-वीरची जोडी म्हणतात”, असेही ते म्हणाले.
-
“ही जोडी खुर्चीसाठी, स्वार्थासाठी झालेली नाही. स्वार्थासाठी एकत्र झाले होते त्यांना सामान्य जनतेने बाजूला केलं”, अशी टीकाही शिंदेंनी यावेळी महाविकास आघाडीवर केली.
-
“एखाद्या जाहिरातीमुळे किंवा कुणाच्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये कुठे काही होईल इतकं तकलादू हे सरकार नाही. हे जुनं सरकार नाही. जुन्या सरकारमध्ये कुणी आधी भाषण करायचं आणि कुणी नंतर भाषण करायचं यावरून गच्ची पकडणारे आम्ही पाहिले. मात्र, हे सरकार सामान्यांसाठी काम करणारं सरकार आहे,” असं म्हणत जाहिरात वादावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर