-
शिवसेनेच्या ५७ वर्धापन दिनानिमित्त शिंदे गटाने गोरेगावातील नेस्को सेंटर येथे भव्य जाहीर सभा घेतली. यावेळी शिवसेनेतील (शिंदे गट) अनेक पदाधिकारी, खासदार, आमदार आणि इतर नेते मंडळी उपस्थित होते. जमलेल्या जनसमुदायाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यत्वे ठाकरे गटाला लक्ष्य केलं. (सर्व फोटो- एकनाथ शिंदे ट्वीटर)
-
“शिवसैनिकांच्या कष्टातून, घामातून आणि त्यागातून ही शिवसेना उभी राहिली असून याच सर्वसामान्य शिवसैनिकांना सोबत घेऊन वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना उभी केली होती. याच लोकांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या उबाठा गटाच्या नेत्यांनी आता तीच तीच कॅसेट वाजवणे बंद करावे आणि निदान आता आपला स्क्रिप्ट रायटर तरी बदलावा”, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली.
-
“शिवसेनेमध्ये दिवसरात्र काम करून शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास पूर्ण केला आहे. हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. मुलगा कधी मोठा झाला ते कळले नाही. स्वतःच्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी देखील प्रचारसभा संपल्यावरच जाऊ शकलो. इथे प्रत्येकाने हाच त्याग केला आहे. यापैकी तुम्ही नक्की काय केलं?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
-
“सर्वसामान्य रिक्षावाल्याने तुमच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातले. गेल्या अडीच वर्षात फक्त २ वेळा मंत्रालयात गेलात आणि जवळ कधी पेनच बाळगले नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात तुम्ही फायलींवर जेवढ्या सह्या केल्या नसतील तेवढ्या सह्या इथे मी मुख्यमंत्री झाल्यावर एका दिवसात केल्या. आजही माझ्या खिशात कायम २ पेन असतात जिथे जातो तिथे आम्ही काम करतो. तुम्ही टोमणेबाजी करत आपली पातळी दाखवत रहा, आम्ही कामातून आमची क्षमता दाखवू”, अशा शब्दांत त्यांच्यावरील आरोपांचा एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतला.
-
“पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेले ३७० कलम हटवले, राम मंदिर बांधले. त्या भाजपासोबत आम्ही युती केली. मात्र तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन उभी राहिलेली शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पायाशी गहाण टाकून खरी गद्दारी केली आहे. मोदींच्या नावावर मते मिळवली आणि निवडणूक झाल्यावर पदाच्या हव्यासापोटी गद्दारी तुम्ही केलीत”, असा हल्लाबोलही एकनाथ शिंदे यांनी केला.
-
“इथे मोदींना मणिपूरवरून बोलता. तुम्ही निदान मालवणीपर्यंत जाण्याचे धाडस तरी करून दाखवा. बिपरजॉय वादळ आलं तेव्हा अमित शहा ३ दिवस गुजरातमध्ये ठाण मांडून बसले आणि २६ जुलैला मुंबईत पूर आला तेव्हा आमच्या दैवताला, बाळासाहेबांना बंगल्यावर एकटे टाकून तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन बसलात”, असा घणाघातही शिंदेंनी केला.
-
“आम्हाला केंद्रीय यंत्रणावरून बोलता. मात्र तुम्हाला जेव्हा एक नोटीस आली तेव्हा तुम्ही गुपचूप जाऊन मोदींना भेटलात हे आम्हाला माहीत नाही का?” असा उपरोधिक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
-
गोरेगाव येथे आयोजित केलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आले होते.
-
“राज्यातील युती सरकार हे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत सरकार आहे. हे सरकार वेगाने काम करतंय याची अनेक उदाहरणे देता येतील. मुंबई शहरातील बीडीडी, एसआरए, म्हाडा, मेट्रो सगळ्या ठप्प पडलेल्या प्रकल्पांना आम्ही गती देणार असून मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणूनच दाखवू”, असा एल्गार एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.
-
“आईच्या मृत्यूचा प्रसंग सांगताना एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले, “मला आठवतंय, लोकसभेची निवडणूक होती. माझी आई रुग्णालयात उपचार घेत होती. मी निवडणूक प्रचारात होतो. याचवेळी मला डॉक्टरांचा फोन आला. डॉक्टरांचा फोन आल्यानंतर माझ्या मनात पाल चुकचुकली. माझ्या बाजुला लोकसभेचे उमेदवार गावित होते. त्यांनी मला निवडणूक सभांचं वेळापत्रक सांगितलं. मी त्यांना म्हटलं, सभा किती वाजता संपतील? त्यांनी सांगितलं नऊ वाजतील.”
-
“पण त्यांना मी कसं सांगू की, माझ्या आईचा जीव गेलाय. माझी आई या जगात नाही. मी त्यांना (गावित) सांगितलं, आपण सभा पूर्ण करू. मी सभा पूर्ण करून आलो आणि रुग्णालयात आईचं अंतिम दर्शन घेतलं. ही मी चूक केली का? असे अनेक प्रसंग आमच्या नेत्यांच्या जीवनात घडले आहेत,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. आईच्या मृत्यूचा प्रसंग सांगतांना एकनाथ शिंदे भावूक झाले होते.
-
“आपलं सरकार आल्यावर मुंबईतील खड्डे बुजवले पाहिजे, काँक्रिटचे रस्ते केले पाहिजेत, कंत्राटदारेचे पैसे कोणाच्या तिजोरीत न जाता काम नये, लोकांच्या कामांसाठी वापरले पाहिजे हा निर्णय घेतला. मुंबई स्वच्छ आणि सुंदर होत आहे. निवडणूक आल्यावर मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार यावर तुम्ही राजकारण करता. जनता आणि मुंबईकर सुज्ञ आहे,” असेही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
-
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्रीपदावरून जाताना काय काय सगळं केलं. वर्षातून बाहेर पडल्यानंतर घरातून बाहेर काढलं, आमच्यावर अन्याय झाल्याचं सांगितलं. यावेळी गळ्याला पट्टा होता, मोठ्या-मोठ्या बॅगा बाहेर चालल्या होत्या.काही रडत होते, काहींना रडायला लावलं. जसं काय आपल्या सातबाराच्या घरातून बाहेर पडतोय. अरे कुणाचे मुख्यमंत्रीपद, कार्यालय, वर्षा बंगला. सत्ता येते-जाते. एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं. पण, दुसऱ्या दिवशी गळ्यातला पट्टा गायब! तरातरा माणूस चालायला लागला. ही कुणाची करामत माहिती का? डॉ. एकनाथ शिंदे,” असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
-
दरम्यान, गेल्यावर्षी शिवसेनेत फुट पडली. या फुटीला आज (२०जून) एक वर्ष पूर्ण होत आहे. ही फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन भाग झाले. ठाकरे गट आणि शिंदे गट. परंतु, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्याने अधिकृतरित्या शिवसेनेचा ताबा शिंदे गटाला मिळाला. परंतु हे प्रकरण अद्यापही न्याय प्रविष्ट आहे.
-
बाळासाहेबांच्या विचाराने स्थापन झालेल्या शिवसेनेचे खरे वारसदार आपणच आहोत, असं एकनाथ शिंदे कायम निक्षूण सांगतात. म्हणूनच, यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे झाले.

राज ठाकरेंबरोबर राजकारणात युती करण्याबद्दल उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले, “आता कोणतीही…”