-
काँग्रेसने हकालपट्टी केलेले संजय निरुपम सध्या प्रचंड चर्चेत आहेत. मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय निरुपम यांनी संताप व्यक्त केला होता. तसंच, याबाबत त्यांनी काँग्रेसलाही जाब विचारला होता. येत्या काळात काँग्रेसकडून उत्तर न आल्यास योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा इशारा त्यांनी काँग्रेस पक्षाला दिला होता. परंतु, त्याआधीच काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या या कारवाईमुळे त्यांनी पक्षावर संताप व्यक्त केला असून सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
जय श्रीराम म्हणत संजय निरुपम यांनी आपल्या पत्रकार परिषदेची सुरुवात केली. महाविकास आघाडीने खिचडी चोराला उमेदवार केले आहे. खिचडी चोराला उमेदवारी देऊन तुम्ही भाजपाला भ्रष्ट जनता पक्ष कसं काय म्हणता? माझ्याकडे माझा पक्ष लक्ष देईल, असं मला वाटलं होतं, असं संजय निरुपम म्हणाले. तसंच, काँग्रेस पक्ष आता विखुरला असून विचारधारेपासूनही दूर गेला आहे, असंही निरुपम म्हणाले.
-
पक्षाकडे संघटनात्मक ताकद नाही. गांधी कुटुंब आणि पक्षाच्या हायकमांडला लक्ष्य करत निरुपम म्हणाले, काँग्रेसची पाच सत्ताकेंद्रे आहेत. सोनिया गांदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल ही त्यांची पाच सत्ताकेंद्रे आहेत. त्यांची स्वतःची लॉबी असून ते एकमेकांना भेटतात, अशीही टीका त्यांनी केली.
-
“आता माझा संयम संपला असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा आहे. वैचारिक आघाडीवर काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवते. महात्मा गांदींचा सर्व धर्म समानतेवर विश्वास होता. सर्व विचारधारांना कालमर्यादा असते. धर्म नाकारणारी नेहरुवादी धर्मनिरपक्षेता आता संपली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काँग्रेस हे मानायला तयार नाही”, असं संजय निरुपम म्हणाले.
-
“संपूर्ण देशच आता धार्मिक झाला आहे. उद्योगपतीही मोठ्या अभिामानाने मंदिरांना भेटी देतात. वैचारिक आणि संघटनात्मकदृष्ट्या काँग्रेस पक्षाची दुरवस्था झाली आहे. काँग्रेसचा वास्तवाशी संपर्क तुटला आहे”, अशी टीका निरुपम यांनी केली.
-
“माझ्यावर कारवाई होणार हे मला माहीत होतं. त्यामुळे मी काल (३ एप्रिल) रात्री १० वाजून ४० मिनिटांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राजीनामा पाठवला. त्यानंतर तत्काळ माझ्यावर कारवाई करण्यात आली. राजीनाम्यातील माझे शब्द, माझ्या भावना पाहून त्यांना वाटलं असेल की हे प्रकरण खूप जास्त होईल. त्यामुळे त्यांनी माझ्यावर कारवाई केली. म्हणजेच ए फोर साईजचा कागद काँग्रेसने बरबाद केला, असं मला वाटतं”, असं ते म्हणाले.
-
एक काळ असाही होता जेव्हा संजय निरुपम हे दोपहर का सामनाचे संपादक होते. त्याच काळात ते शिवसेनेतही होते.
-
मात्र २००५ मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. उत्तर भारतीय फेरीवाल्यांचा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता.
-
२००९ च्या निवडणुकीत त्यांनी मुंबई उत्तर जागेवरुन विजय मिळवला होता. संजय निरुपम हे दोनदा राज्यसभेचे खासदार होते. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी उत्तर मुंबई लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं. (सर्व फोटो – संजय निरुपम/फेसबूक)

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा…’