-
पुणे : वैशाख वणव्याचा दाह कमी करण्याच्या उद्देशातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला वैशाख पौर्णिमेनिमित्त सोमवारी पाच हजार शहाळ्यांची सजावट करण्यात आली.
-
शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार असल्याने सोमवारी सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. मंदिरामध्ये गणेशयाग करण्यात आला.
-
वैशाख वणव्यापासून नागरिकांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष्य या शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारतासाठी श्रीमंत दगडूशेठ गणपतिला पाच हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
-
श्री गणेशांचे विविध लीला स्वरूपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
-
दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला होता. पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशांनी विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध केला. त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो.
-
गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची आणि वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती. मंदिरात पहाटे सानिया पाटणकर आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा अर्पण केली. श्रीगणेश पुराण आणि मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो.
-
वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. – महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
-
उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे, शेतकऱ्यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या भावनेतून शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. ससून रुग्णालयातील रुग्णांना मंगळवारी (१३ मे) शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे. – महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
-
(सर्व फोटो साभार लोकसत्ता टीम) हेही पाहा- पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी हात पुढे करण्यामागचे कारण काय? भारतीय लष्कराने ‘सिंदूर’ मोहिमेबद्दल सांगितल्या महत्वपूर्ण गोष्टी…

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”