-
युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी लपण्यासाठी जमिनीखाली बंकर बांधले जायचे. विश्वयुद्धाच्या काळामध्येही असे अनेक बंकर्स बांधण्यात आलेले. मात्र आता या सगळ्या भूमिगत बंकर्सचा शोध घेणं शक्य नाहीय. मात्र लंडनमधील वोलव्हरहॅम्पटन येथील एका व्यक्तीला त्याच्या अंगणामध्येच असं एक जमिनीखालील सिक्रेट बंकर सापडलं. मागील ४० वर्षांपासून आपण ज्या घरात राहत होतो त्या घराच्या अंगणाखाली बंकर असेल असा विचार मूळचे भारतीय असणाऱ्या ६८ वर्षीय खंडू पटेल यांनी कधीच केला नव्हता. (सर्व फोटो : रोनाल्ड लिओन यांनी काढलेले आहेत 'द सन'च्या सौजन्याने साभार)
-
घरातील अंगणामधील मॅनहोलच्या झाकणासंदर्भातील कामाच्या वेळी या बंकरचा शोध लागला. मात्र त्यापेक्षाही हे बंकर काय आहे हे समजल्यानंतर पटेल यांना धक्का बसला. मागील चार दशकांपासून शाळेमध्ये केअर टेकर म्हणून काम करणारे खंडू पटेल आणि त्यांच्या पत्नी आशा यांना अंगणाखाली असं काही असेल असं वाटलं नव्हतं. बागेमध्ये काम करताना त्यांना या गोष्टीचा शोध लागला हे ही विशेष.
-
द सनने दिलेल्या वृत्तानुसार पटेल यांचं घर १९२० च्या दशकामध्ये बांधण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी घर बांधणाऱ्या मूळ मालकाने येथे सुरक्षेसाठी काही बंकर्स बांधले होते. असेच एक बंकर त्यांनी घरातील अंगणात असणाऱ्या हिरवळीच्या खाली बांधलं होतं. "अनेकदा मला प्रश्न पडायचा की अंगणामध्ये मॅनहोलचं झाकणं असण्यामागे काय कारण असावं. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये आम्ही इथं काम करत असतानाच हे झाकण उचलण्याचा निर्णय घेतला. त्याखाली आम्हाला काँक्रीटचं बांधकाम दिसलं. आम्ही खोदण्यास सुरुवात केली तर पुढे आम्हाला शिड्या असल्याचे दिसलं. ते पाहून आम्हालाही मोठं आश्चर्य वाटलं," असं पटेल या बंकरच्या शोधाबद्दल बोलताना सांगतात.
-
आपल्या मित्रांच्या मदतीने पटेल यांनी दहा फुटांपर्यंत खोदकाम केलं. शिड्यांच्या मदतीने आतमध्ये गेल्यावर त्यांना खाली एक छोटी खोलीच असल्याचे दिसले. आता पटेल यांनी या बंकरची साफसफाई केली असून छान रंगरंगोटी आणि वीजेचीही सोय येथे केली आहे. येथे त्यांनी टेबल आणि खुर्च्याही ठेवल्या असून ते या जागेचा वापर बार म्हणून करतात.
-
दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये येथील सर्व रस्त्यांवरुन युद्धाचे सामान वाहून नेणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असावी असा अंदाज आहे. त्यावेळी या ठिकाणी किमान ४० जण आश्रय घेत असावेत. आम्ही या जागेचा वापर बार म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. इथे जास्त आराम करता येतो आणि निवांतपणा वाटतो, असं पटेल यांनी सांगितलं.

डोक्यातील निगेटिव्ह विचारांमुळे रात्री झोपच लागत नाही? फक्त ५ उपाय; शांत लागेल झोप