-
टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रथमच रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचं नाव घेऊन महत्त्वाचा दावा केला आहे. गोस्वामी यांनी टीआरपी वाढवण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे(बार्क) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा दावा केला आहे. त्यातून दासगुप्ता यांनी सोनं, लाखाचं घड्याळं, महागडी रत्न खरेदी केली, असं पोलिसांनी म्हटलं आहे. (सर्व छायाचित्र संग्रहित/इंडियन एक्स्प्रेस)
-
टीआरपी घोटाळ्याचे बिंग फुटल्यापासून मुंबई पोलिसांनी प्रत्यक्ष अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख केलेला नव्हता. या प्रकरणात पहिल्यांदाच गुन्हे शाखेने गोस्वामी यांचे नाव जाहीरपणे घेतले. आतापर्यंत संशयितांमध्ये रिपब्लिक वाहिनीचे चालक, मालक असाच उल्लेख होत होता.
-
मागील आठवड्यात पुण्यातून बार्क माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पार्थो यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच त्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी गुन्हे शाखेने न्यायालयाकडे केली. त्यावेळी गुन्हे शाखेने गोस्वामी-दासगुप्ता यांच्यात घडलेल्या आर्थिक व्यवहाराबाबतही माहिती दिली.
-
गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितले की,"दासगुप्ता बार्कचे सीईओ असताना अर्णब गोस्वामी आणि अन्य आरोपींनी चुकीच्या मार्गाचा वापर करून टीआरपी वाढण्याचा कट रचला. रिपब्लिक भारत हिंदी वृत्तवाहिनी आणि रिपब्लिक टीव्ही या इंग्लिश वृत्तवाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी गोस्वामींनी अनेक वेळा दासगुप्ता यांना लाखो रुपये दिले. तपासातून ही माहिती समोर आली आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली.
-
अर्णब गोस्वामींकडून देण्यात आलेल्या पैशातून दासगुप्ता यांनी सोन्याचे दागिने, मौल्यवान रत्न आणि महागड्या वस्तू खरेदी केल्या. या वस्तू दासगुप्ता यांच्या घरातून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. एक लाख रुपयाचं घड्याळ, सोनं आणि महागडी रत्न दासगुप्ता यांच्या घरातून जप्त केल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं.
-
सहायक पोलीस निरीक्षक सचिन वझे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना याविषयी माहिती दिली. "दासगुप्ता यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी अर्णब गोस्वामींना तीन वेळा भेटल्याचं सांगितलं."
-
"दासगुप्ता यांनी गोस्वामींना तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटल्याची माहिती दिली. दासगुप्ता आणि अर्णब टाइम्स नाऊमध्ये सोबत कामाला होते. अर्णब गोस्वामींनी दासगुप्ता यांना डॉलरद्वारे पैसे दिले," असं वझे म्हणाले.
-
"डिसेंबरच्या सुरूवातीलाच दासगुप्ता आणि रोमिल रामगढिया यांना अटक करण्यात आलं. बार्कचे काही माजी कर्मचारीही या घोटाळ्यात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे," असं वझे यांनी सांगितलं.
-
तिसरा ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. पोलिसांच्या माहिती प्रमाणे जुलैमध्ये बार्ककडे ऑडिट रिपोर्ट पाठवण्यात आला होता.
-
रिपब्लिक टिव्हीचं रेटिंग जास्त दिसण्यासाठी टाइम्स नाऊचं रेटिंग कमी करण्यात आल्याचं या ऑडिट रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं होतं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल केला होता. ज्यात रिपब्लिक टीव्हीसह बॉक्स सिनेमा आणि फॅक्ट मराठी वाहिन्यांवर आरोप करण्यात आला होता.

Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…