-
काश्मीरमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. यामुळेच रस्ते तसेच विमान वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. काश्मीर खोऱ्यातील सामान्य जनजीवनही विस्कळीत झालं आहे.
-
अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे. काश्मीरमधील या बर्फवृष्टीचे फोटो सोशल नेटवर्कींगवर चांगलेच व्हायरल झालेत.
-
जम्मू आणि काश्मीरमधील बर्फवृष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे की १३ जानेवारी रोजी दिल्लीच्या दिशेने उड्डाण घेण्यासाठी निघालेल्या विमानाचे उड्डाणही थांबवावे लागले आणि ते ही चक्क विमान बर्फामध्ये अडकल्याने.
-
श्रीनगरहून दिल्लीला येणाऱ्या या विमानामध्ये एकूण २३३ प्रवासी होते. मात्र विमानाने उड्डाण घेण्याआधीच ते बर्फामुळे ओल्या झालेल्या रनवेच्या नियोजित मार्गापासून सरकले आणि बाजूला असणाऱ्या बर्फात अडकले.
-
सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही कोणत्याही पद्धतीची दुखापत झाली नाही. मात्र विमानाच्या उड्डाणासाठी नक्कीच उशीर झाला.
-
या घटनेनंतर कंपनी तसेच विमानतळावरील अधिकाऱ्यांनी विमानाकडे धाव घेतली. विमानाचा उजवा पंखा बर्फाखाली अडकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हळूहळू तो बर्फ फोडण्यात आला.
-
हा बर्फ बाजूला केल्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर या विमानाने उड्डाण केलं. या सर्व गोंधळात प्रवाशांचे काही तास वाट पाहण्यातच गेले.
-
यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनेही दिलं आहे.
-
मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने रुग्णवाहिकेसारखी अत्यावश्यक सेवाही बंद असल्याने अनेक ठिकाणी रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी पायी किंवा अंगाखांद्यावर उचलूनच प्रवास करण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. भारतीय लष्करातील जवानही या कामामध्ये मदत करताना दिसत आहेत.
-
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी ही बर्फवृष्टी म्हणजे नैसर्गिक संकट असल्याची घोषणा केलीय. या घोषणेमुळे सरकारला स्थानिकांना वेगवेगळ्या योजनांअंतर्गत मदत करता येणार आहे. नायब राज्यपालांच्या घोषणेमुळे नैसर्गिक संकटानंतर झालेलं नुकसान हे वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्थिक मदतीच्या रुपात भरून काढण्यासाठी स्थानिकांना मदत होणार आहे.
-
रविवारपासून काश्मीरमध्ये सतत बर्फवृष्टी होत असून याचा मोठा फटका स्थानिकांना बसला आहे. रस्ते वाहतुकीबरोबरच हवाई उड्डाणांनाही या बर्फवृष्टीचा फटका बसला आहे. रात्री पारा शून्य अंश सेल्सियसच्या खाली असतो. उत्तर काश्मीरमधील गुलमर्गमध्ये रात्रीचं तापमान उणे १० पर्यंत घसरते. सध्या काश्मीरमध्ये चिल्लाई कालनचा कालावधी सुरु आहे. वर्षातील ४० दिवस सर्वाधिक बर्फवृष्टी होण्याचा जो कालावधी असतो त्याला स्थानिक लोकं चिल्लाई कालन असं म्हणतात. या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये तापमान शून्य अंशाच्या आसपास असते. तसेच अनेक ठिकाणी तलावं गोठलेली असतात. यामध्ये दल लेकसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाचाही समावेश आहे. (फोटो : एएनआय आणि ट्विटरवरुन साभार)

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”