-
थायलंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे देशातील लोकशाहीसंदर्भात पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. देशातील एका ६५ वर्षीय महिलेने शाही कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर अपमानजनक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी खटला चालवण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेला या गुन्ह्यासाठी निव्वल दोषी ठरवण्यात आलं असं नाही तर तिला चक्क ४३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला एखाद्याचा अपमान करण्यासाठी थायलंडमध्ये सुनावण्यात आलेली ही सर्वाधिक शिक्षा असल्याचा दावा या महिलेच्या वकिलाने केला आहे. एंचान प्रीलर्टी नावाच्या या महिलेचं नाव आहे.
-
थायलंडमधील लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांकडून देशाचे राजे महाराजा महा वजीरालोंगकोर्न यांच्याविरोधात मागील अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे.
-
लोकशाही मुल्यांचे पालन केलं जावं अशी मागणी केल्या जाणाऱ्या या आंदोलनात सहभागी झालेले अनेकजण हे थेटपणे राजेशाही आणि देशातील शाही कुटुंबावर उघडपणे टीका करत असतानाच एंचान यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
-
थायलंडमध्ये शाही कुटुंबासंदर्भात लेसे मॅजेस्टी कायदा अस्तित्वात आहे. या काद्यानुसार शाही कुटुंबावर टीका करणाऱ्या आणि कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला एका गुन्ह्यासाठी किमान १५ वर्षांची शिक्षा सुनावली जाते.
-
एंचान यांना लेसे मॅजेस्टी कायद्याअंतर्गत २९ वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आल्याचं रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. यामध्ये सर्वात गंभीर आरोप हा शाही कुटुंबाविरोधात यूट्यूब आणि फेसबुकवर २०१५-१५ साली एंचान यांनी व्हिडीओ पोस्ट केल्याचा होता.
-
एंचान यांचे वकील पावीन चुमस्री यांनी दिलेल्या माहितीनुसार एंचान यांना ८७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र एंचान यांनी आपला गुन्हा कबुल केल्यानंतर त्यांची शिक्षा अर्ध्याने कमी करण्यात आली. लेसे मॅजेस्टी कायद्याअंतर्गत करण्यात आलेली ही थायलंडमधील आतापर्यंतची सर्वात मोठी शिक्षा आहे. एंचान आता वरिष्ठ न्यायालयांमध्ये यासंदर्भातील याचिका दाखल करुन या निर्णयाला आव्हान देऊ शकतात.
-
२०१४ साली जनतेने लोकशाही मार्गाने निवडून दिलेलं सरकार पाडत देशात सेनेने सत्तांतर केलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी म्हणजेच २०१५ साली जानेवारी महिन्यात सुरक्षा दलांनी एंचान यांच्या घरी छापा मारला होता. यावेळी त्यांच्या घरात सापडलेल्या वस्तूंच्या आधारे लेसे मॅजेस्टी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
-
आधी देशातील राजेशाहीविरोध भाष्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेलं एंचान यांच्याविरोधातील हे प्रकरण लष्करी न्यायालयाकडे होतं नंतर २०१९ साली ते सामान्य न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं. २०१४ च्या संत्तांतरणासाठी एकूण १६९ जणांविरोधात लेसे मॅजेस्टी कायद्याअंतर्गात खटले चालवण्यात आले.
-
सोमवारी एंचान यांच्यासोबत अशाच एका खटल्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या एका व्यक्तीला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या व्यक्तीला २०१४ सालीच अटक करण्यात आलीय. या व्यक्तीने राजाविरोधात काही कविता आणि लेख लिहिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.
-
२०२० पासूनच थायलंडमध्ये मोठ्याप्रमाणात येथील राजेशाहीविरोधात आंदोलने सुरु आहेत. देशामध्ये लोहशाहीला प्राधान्य देण्यात यावं असं आंदोलकांचं म्हणणं आहे. देशात सध्या नावापुरती लोकशाही असून राजाचा मनमानी कारभार आता येथील तरुणांनी नाकारला आहे.
-
थायलंडचे विद्यमान राजा महा वजीरालोंगकोर्न हे त्यांच्या वागणुकीमुळे कायमच चर्चेत असता. राजा असूनही थायलंड हा लोकशाही देश आहे. थायलंडमध्ये राजाच्या आशीर्वादाने काम करू पाहणारा पंतप्रधान आहे आणि त्या आशीर्वादाच्या बदल्यात राजाच्या कृष्णकृत्यांकडे दुर्लक्ष करण्याची त्याची तयारी आहे. आणि ही कृष्णकृत्ये तरी काय? तर पैशाची प्रचंड अफरातफर आणि त्याच्या आधारे सततचा सुरू असलेला लैंगिक विकृतोत्सव.
-
राजा महा वजीरालोंगकोर्न हा आपल्या प्रजेबरोबर राहायला तयार नाही. तो राहतो जर्मनीत. आपल्या लग्नाच्या बायका आणि २० ललनांचा रंगमहाल यांच्यासमवेत. त्यांच्या तेथे राहण्याची आणि जीवनशैलीची खरे तर जर्मनीसही लाज वाटते. याच राजाविरोधात त्याच्याच देशात हजारोच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे चित्र मागील अनेक महिन्यांपासून दिसत आहे.
-
‘मोटारसायकली उडवणे, खाणे आणि संग करणे या तीन गोष्टींतच थायलंडच्या महाराजांना रस आहे,’ असे जर्मन अधिकाऱ्याचे अलीकडचे वक्तव्य. या महाराजा महा वजीरालोंगकोर्न यांच्या चार पत्नी होऊन गेल्या. त्यांपासून झालेल्या आपल्या अपत्यांनाच हे महाराज ओळख नाकारतात.
-
अलीकडेच एका महिला विमान कर्मचारीस या महाराजाने अधिकृत अंगवस्त्रचा दर्जा देऊन सर्वानाच ओशाळे केले. आपल्या जन्मदिनी आपल्या एका पत्नीकडून नग्नावस्थेत रांगत जन्मदिनाचा केक कापून घेणारा आणि त्याची अशी चित्रफीत काढण्याइतका हा महाराज विकृत आहे.
-
या साऱ्या गोंधळात एंचान यांना सुनावण्यात आलेली शिक्षा ही इतर आंदोलकांसाठी इशारा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असं असलं तरी आंदोलकांची संख्या आणि आंदोलनाची व्याप्ती पहाता या शिक्षेमुळे राजेशाहीविरोधातील आवाज आणखीन जोमाने उठवला जाईल अस मतही राजकीय जाणकार व्यक्त करतात. (सर्व फोटो रॉयटर्स)

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक