-
करोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न घालताच इंडोनेशियामधील बालीमध्ये भटकंती करणाऱ्यांना स्थानिकांना पोलिसांनी एक आगळीवेगळी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार मास्क न घातलेल्या परदेशी नागरिकांना सध्या बालीमध्ये सार्वजनिक ठिकाणीच पुश अप्स मारण्याची शिक्षा केली जात आहे.
-
सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये पर्यटक हे सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर रस्त्यावर, फुटपाथवर पुश अप्स मारताना दिसत आहेत.
-
२०२० मध्ये बालीतील स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक केलं आहे. पर्यटक असो किंवा स्थानिक घराबाहेर पडताना मास्क घालणं हे अत्यावश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे.
-
बाईक भाड्याने घेऊन भटकंती करणाऱ्या मात्र मास्क न वापरणाऱ्या अशाच बेजबाबदार पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केलीय. मात्र यापैकी अनेक पर्यटक हे आपल्याकडे दंड म्हणून देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगतात. अशा पर्यटकांना पोलिसांनी पुश अप्स मारण्याची शिक्षा सुनावतात. हळूहळू सर्वच पर्यटकांना आता ही शिक्षा सुनावली जात आहे.
-
विशेष म्हणजे तुम्ही ज्यांच्यासोबत फिरत असाल त्यांच्यासमोरच तुम्हाला पोलीस पुश अप्स मारण्याची शिक्षा देतात. प्रत्येकाला किमान २५ पुश अप्स मारावे लागतात.
-
बालीचे गव्हर्नर आय वायन कोस्टर यांनी नियम न पाळणाऱ्या पर्यटकांना हॉटेल आणि इतर सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी घालण्यात येईल असा इशारा दिला आहे. सध्या करोनाचा धोका संपलेला नाही त्यामुळे अशी बेजबाबदार वागणूक खपवून घेतली जाणार नाही असंही गव्हर्नर म्हणाले आहेत.
-
आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अशी पुश अप्सची शिक्षा देणं, तसेच अशा बेजबाबदार पर्यटकांना देशातून हकलवून लावण्याच्या मागणीला अनेक पर्यटकांचा पाठींबा असल्याचं चित्र दिसत आहे.
-
बालीमध्ये आतापर्यंत २१ हजार जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर येथील ६०० हून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. असं असतानाही पर्यटनासाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांना परिस्थितीचे गांभीर्य कळत नसल्याने पोलिसांना अशी सार्वजनिक ठिकाणीच शिक्षा देण्याची कारवाई करावी लागत आहे.
-
कारवाई करुन झाल्यानंतर पोलिसांकडून दंड आकरण्यात येते आणि पर्यटकांची माहिती घेतली जाते. दुसऱ्यांना अशाच पद्धतीने पर्यटक नियमांचे उल्लंघन करताना आढल्यास त्यांच्यावर अजून कठोर कारवाई केली जात आहे.
-
कारवाई करण्यात येणारे अनेक पर्यटक हे प्रामुख्याने ऑस्ट्रेलियन असल्याचं एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: एएफपी आणि एबीसी न्यूज ऑस्ट्रेलियाच्या यूट्यूब अकाऊंटवरुन स्क्रीनशॉर्ट)

Video: ‘तो झोपेतून उठला नाही म्हणून वाचला’, निवृत्त न्यायाधीशाच्या घरात दरोडा, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल