-
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ ही कार उभी करण्यात आली होती. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या सुट्या कांड्या आढळल्या. ‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच या प्रकरणाला शुक्रवारी (५ मार्च) नाट्यमय वळण मिळालं. (Photos_ANI)
-
अंबानी यांच्या घराजवळ गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी सोडलेल्या स्कॉर्पियो कारशी संबंधित असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीतून पोलिसांना मिळाला. मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
-
यातच मनसुख हिरेन आणि अंबानींच्या घरासमोर आढळून आलेल्या बेवारस स्कॉर्पियो कारचं कनेक्शन काय होतं?
-
या संपूर्ण प्रकरणात स्कॉर्पिओ कारबरोबरच पांढरी इनोव्हा कारही वापरण्यात आल्याचं आढळून आलं होतं. यातील स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून(ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील) चोरण्यात आली. तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं होतं.
-
स्कॉर्पियो कार ही ठाण्यात राहणारे ऑटोमोबाइल व्यावसायिक हिरेन मनसुख यांची असल्याचं समोर आलं होतं. लॉकडाउनमध्ये ही कार वर्षभर एका जागी उभी होती. ती दुरुस्त करून विकण्याचा मनसुख यांचा विचार होता. (Photos_ANI)
-
ही कार घेऊन ते १७ फेब्रुवारीला ऑपेरा हाऊस येथे निघाले होते. मात्र स्टेअरिंग जाम झाल्याने त्यांनी ही कार उड्डाणपुलाजवळ सोडली. रात्री परत आले तेव्हा ही कार तेथे नव्हती. याप्रकरणी त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कारचोरीची तक्रार नोंदवली होती.
-
स्टिअरिंग फिरत नव्हते मग चोरणाऱ्या व्यक्तींनी कार पुढे कशी नेली? हा प्रश्न पोलिसांसमोर पडला होता. त्यामुळे याप्रकरणात पोलीस मनसुख यांचीही चौकशी करत होते.
-
तर दुसरीकडे "जप्त करण्यात आलेली गाडी सॅम पीटर न्यूटन यांची होती. ती गाडी मनसुख हिरेन यांच्याकडे नुतनीकरणासाठी दिली होती. पण त्यांनी पैसे दिले नाही म्हणून मनसुख हिरेन यांनी ही गाडी स्वतःकडे ठेवून घेतली होती," अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. (Photos_ANI)
-
मनसुख हिरेन यांचा ठाण्यात कार डेकोरचा व्यवसाय आहे. काल (४ मार्च) रात्री आठपर्यंत ते दुकानात बसलेले होते. सोबत त्यांचा मुलगादेखील होता. त्याचवेळेस त्यांना कांदिवलीवरुन फोन आला आणि घोडबंदरला रस्त्यावर भेटायला बोलावलं असल्याचं सांगून ते दुकानातून बाइकवर घरी जाण्यासाठी निघाले. मनसुख हिरेन हे दुकानातून घरी आल्यानंतर सुमारे ८.३० वाजता घरातून बाहेर पडले होते. मात्र, तेव्हा त्यांनी बाइकसोबत नेली नव्हती. त्यानंतर मात्र त्यांचा कोणसोबतही संपर्क झाला नाही, असं त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलेलं आहे.
-
ही कार कोणी चोरली, चोरून कोठे नेली याबाबत विक्रोळी पोलिसांसह अंबानी प्रकरण तपासणाऱ्या गुन्हे शाखेला नेमकी माहिती मिळालेली नाही. मात्र याचदरम्यान मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्यानं प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. सहआयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निरीक्षणानुसार चोरी झाल्यापासून अंबानी यांच्या घराजवळ येईपर्यंत ही कार अज्ञात स्थळी, सीसीटीव्हीच्या परिघाबाहेर ठेवण्यात आली असावी.
-
दरम्यान, मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांच्या पत्नी विमल हिरेन यांच्या मृत्यूवरून शंका उपस्थित केल्या आहेत. “मी आणि माझं कुटुंब असा विचारही करु शकत नव्हतं. आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी गेली होती. पोलीस जेव्हा कधी फोन करायचे, तेव्हा माझे पती चौकशीसाठी जात होते. पोलीस तासनतास त्यांना बसवून ठेवायचे. कालही त्यांना बोलावलं होतं, ते गेले होते पण परत आले नाही. १० वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवली क्राइम ब्रांचमधून तावडे म्हणून कोणाचा तरी फोन आला होता. ते गेल्यानंतर अर्ध्या तासात फोन बंद झाला. आम्ही रात्रभर वाट पाहिली. सकाळीपण काही पत्ता नसल्याने तक्रार दिली,” असं विमल हिरेन यांनी म्हटलेलं आहे. (Photos_ANI)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?