-
आपल्या लांबलचक सुळ्यांसाठी ओळखला जाणाऱ्या ‘भोगेश्वर’ हत्तीचं शनिवारी कर्नाटकमधील बांदीपुर व्याघ्र प्रकल्पामध्ये निधन झालं. गुंद्रे रेंजमध्ये हा देखणा हत्ती अखेरचा पहावयास मिळाला.
-
वन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘भोगेश्वर’ हत्ती ६० वर्षांचा होता.
-
या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांमध्ये ‘भोगेश्वर’ हत्ती फारच लोकप्रिय होता. या हत्तीला ‘मिस्टर काबिनी’ नावाने ओळखलं जायचं.
-
‘भोगेश्वर’ अनेकदा बंदीपूर आणि नागरलोहच्या जंगलांमध्ये भटकंती करताना पर्यटकांना दिसायचा. अनेकदा त्याला पर्यटकांनी काबिनी नदीच्या डोहात डुंबताना पाहिल्याने त्याला ‘मिस्टर काबिनी’ नाव देण्यात आलेलं.
-
शासकीय नियमानुसार ‘मिस्टर काबिनी’वर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधी त्याचे हस्तीदंत काढून घेण्यात आले असून ते संरक्षित म्हणून जतन केले जाणार आहेत.
-
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि येथील स्थानिक आदिवासी लोकांनी या हत्तीला आधी भोगेश्वर नाव दिलं होतं. हा हत्ती अनेकदा बंदीपूर आणि नागरहोल येथील जंगलांमध्ये असणाऱ्या भोगेश्वर मंदिराजवळ दिसून यायचा, म्हणून त्याला हे नाव देण्यात आलेलं.
-
‘भोगेश्वर’च्या सुळ्यांची लांबी ही ८.५ फूट इतकी होती. त्याचे जुळे जवळजवळ जमिनीला लागायचे. तो नेहमीच त्याच्या या लांबलचक हस्तीदंतांमुळे पर्यटकांमध्ये आकर्षणाचा विषय राहिला.
-
‘भोगेश्वर’चे सुळे जमिनीच्या बाजूला वाढताना एकमेकांना छेद देत असल्याने त्याला गवत खाताना अडचणींचा समान करावा लागायचा.
-
विशेष म्हणजे ‘भोगेश्वर’ हा जंगलामध्ये हत्तींच्या कळपामध्ये न राहता एकटाच भटकायचा. अनेकदा तो पर्यटकांना असा एकटाच भटकताना दिसायचा.
-
भोगेश्वर हा कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या नजरेतून सुटल्याने जिवंत राहिला किंवा ‘भोगेश्वर’ वीरप्पनलाही चकवा देण्यात यशस्वी ठरला असं सांगितलं जातं.
-
वीरप्पनने १९८० ते १९९० दशकामध्ये हस्तीदंतांसाठी अनेक हत्तींची कत्तल केलेली. त्या काळात हस्तीदतांना मोठी मागणी होती.
-
सत्यमंगलम वन क्षेत्रातून आणि कर्नाटमधील इतर जंगलांमधून हस्तीदंतांची तस्करी व्हायची. वीरप्पनच्या टोळीकडून प्रामुख्याने ही तस्करी केली जायची.
-
एकीकडे शेकडो हत्तीची शिकार केली जात असताना ‘भोगेश्वर’ मात्र वीरप्पनच्या नजरेतून सुटला होता. अनेकजण त्याने वीरप्पनच्या टोळीला चकवा कसा दिला याबद्दल रंजक गोष्टी आजही सांगताना दिसतात.
-
‘भोगेश्वर’च्या मृत्यूमुळे अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या फोटोसहीत भावनिक मजकूर पोस्ट करत या लाडक्या हत्तीला अखेरचा निरोप दिलाय.
-
वन विभागाकडून तयार करण्यात आलेल्या अनेक महितीपर चित्रपटांमध्ये ‘भोगेश्वर’ हत्तीला दाखवण्यात आलाय.
-
५५ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे ‘भोगेश्वर’सारखे केवळ सहा ते सात हत्ती सध्या बंदीपूर आणि नीलगिरीच्या जंगलांमध्ये उरलेत असं वन अधिकारी सांगतात. (सर्व फोटो ट्विटर, एक्सप्रेस अर्काइव्ह, विकीपिडायवरुन साभार)

