-
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कुर्डू या गावी मुरूम उपसा करणाऱ्यांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षक यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोन केला आणि हे प्रकरण देशपातळीवर चर्चेत आले.
-
तीन वर्षांपूर्वी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस बनलेल्या अंजना कृष्णा एका दिवसात चर्चेचा विषय ठरल्या. अतिशय कडक स्वभावाच्या अजित पवारांना त्यांनी तोंड दिल्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार तसे कडक शिस्तीचे आणि प्रशासनावर जरब बसविणारे नेते म्हणून ओळखले जातात. पण अगदीच नवख्या असलेल्या अंजना कृष्णा यांच्यामुळे ते अडचणीत आले. एवढेच नाही तर वाद उद्भवल्यानंतर त्यांना सोशल मीडियावरून आपली भूमिकाही स्पष्ट करावी लागली.
-
अंजना कृष्णा यांची काही काळापूर्वीच सोलापूरमधील करमाळा तालुक्याच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्या २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
-
अंजना कृष्णा यांचा जन्म केरळमधील तिरुवनंतपुरम येथील आहे. अंजना कृष्णा यांचे वडील बिजू हे कपड्यांचे छोटेसे दुकान चालवतात. तर त्यांची आई सीमा या न्यायालयात टायपिस्ट आहेत.
-
केरळमध्ये प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंजना कृष्णा यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. २०२२ साली त्यांनी भारतातून ३५५ वा क्रमांक पटकावला होता. महाराष्ट्रात येण्यापूर्वी त्यांनी केरळमध्येही प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले होते.
-
सदर प्रकरण उजेडात आल्यानंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत पोलीस दलाचा मान राखत असल्याचे स्पष्ट केले. तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे, असेही ते म्हणाले.
-
“मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे”, असेही अजित पवार पुढे म्हणाले.
-
सोलापूरमधील मुरूमाच्या उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून संवाद साधला होता. यावेळी अजित पवार म्हणाले की, ऐक, मी उपमुख्यमंत्री बोलत आहे. मी तुम्हाला आदेश देतो की, कारवाई रोखा.
-
मात्र कार्यकर्त्याच्या मोबाइलवर फोन आल्यामुळे पोलीस उपअधीक्षक यांनी अजित पवारांना ओळखले नाही आणि त्यांनी आपल्या फोनवर फोन का नाही केला? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवार संतापले आणि त्यांनी तुमच्यावर कारवाई करू, असे संतापून म्हटले.
-
“तुम्हाला मला पाहायचे आहे का? तुमचा मोबाइल नंबर द्या, तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करतो आणि माझा चेहरा दाखवतो. तुमची एवढी हिंमत झाली का?”, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. त्यानंतर अंजना कृष्णा यांना व्हिडीओ कॉल करून अजित पवार यांनी त्यांना कारवाई रोखण्याचे थेट आदेश दिले.

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी