संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या मागे फरफटत जाणार नाही हे स्पष्ट करतानाच सावरकरांच्या मुद्द्यावर कायम टोचणाऱ्या भाजपलाही योग्य प्रत्युत्तर दिले आहे.

‘माफी मागायला मी काही सावरकर नाही’ असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने केले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानाचा मुद्दा राज्यात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तापविण्यास सुरुवात केली आहे. सावरकरांचा अपमान कराल तर राज्यात फिरू देणार नाही, असा सूचक इशाराच मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी व काँग्रेसला दिला. राहुल गांधी सातत्याने सावरकर यांचा अपमान करीत असताना उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का, अशी कळ भाजपकडून सातत्याने काढली जात असे. सावरकांचा अपमान शिवसेना व ठाकरे निमूटपणे सहन करीत असल्याचा आरोपही भाजपचे नेते करीत होते. या पार्श्वभूमीवर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा देत ठाकरे यांनी आरोप करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा… छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल घडविण्याचा भाजप आणि एमआयएमचा डाव, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आरोप

ठाकरे यांनी महाविकास आघाडीत समावेश केल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्याने भाजपकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे. ठाकरे आता काँग्रेसबरोबरच अल्पसंख्याकांचे लांगूनचालन करीत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. उद्धव ठाकरे यांना शह देण्याकरिता भाजपने राज ठाकरे हे आक्रमक हिंदुत्वावादी नेते म्हणून त्यांचे नेतृत्व पुढे आणण्यावर भर दिला. यामुळेच पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिम आणि सांगलीतील अल्पसंख्याक समाजाच्या अतिक्रमणाचा विषय मांडताच अवघ्या २४ तासांत त्यावर कारवाई झाली.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : “राहुल गांधींना अपात्र ठरवलं म्हणून निषेध करायचा, दुसरीकडे…”, सुहास कांदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

सावरकरांचा अपमान सहन करणार नाही हे जाहीर करीत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. राहुल गांधी यांच्यावरून काँग्रेसला टोचले आहे. ठाकरे यांनी कितीही टीका केली तरी काँग्रेसमध्ये फार काही प्रतिक्रिया उमटणार नाही. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोडे मार आंदोलन होऊनही काँग्रेसचे आमदार गप्प बसले. सध्या काँग्रेसला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गरज आहे. यामुळे ठाकरे कितीही काही बोलले तरीही काँग्रेस सारे निमटूपणे सहन करणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On savarkar issue uddhav thackeray poked congress and gave straight reply to bjp print politics news asj
First published on: 27-03-2023 at 11:00 IST