दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : वसंतदादा साखर कारखान्याचा मद्यार्क प्रकल्प बेकायदेशीर चालविण्यात आला असून याचे लाभार्थी असलेल्या स्वप्नपूर्ती शुगरवर कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत आग्रह धरला. काही दिवसापुर्वी कृष्णा नदीतील झालेल्या माशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यावरून वसंतदादा कारखान्याचा मद्यार्क प्रकल्प आणि भाडेकराराने दत्त इंडिया चालवित असलेला साखर कारखाना प्रदुषण नियंत्रण मंडळाने बंद केला. या निमित्ताने कृष्णा नदीबरोबरच सांगलीचे राजकारणही प्रदुषित झाले आहे का अशी  शंका येत आहे.

कृष्णा नदी ही प्रदुषित होण्याला केवळ सांगली महापालिकेचे सांडपाणी वाहून नेणारा शेरीनालाच जबाबदार असेल तर कराडपासून अनेक कारखाने, ज्यामध्ये राजारामबापू  कारखानाही जसा येतो तसाच दूधसंघाबरोबरच मोठी गावेही थेट सांडपाणी कृष्णेच्या पात्रात सोडतात. गेल्या आठवड्यात  कृष्णेतील लाखो माशांचा काठावर खच पडला होता, पण यापुर्वीही नागठाणे, डिग्रज बंधारा या ठिकाणीही मासे मृत झाले होते. नदीपात्रात दुषित पाणी कोण कोण सोडत  आहे याची माहिती  हरित लवादाने नियुक्त केलेल्या अहवालात नमूद आहे, मग वसंतदादा कारखान्याच्या मद्यार्क प्रकल्पाचीच एवढी गहन चर्चा कशासाठी? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो.

हेही वाचा >>> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने इच्छुकांची घालमेल

थकित सुमारे ९० कोटींच्या कर्जासाठी वसंतदादा कारखान्याचा ताबा मद्यार्क प्रकल्पासह जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला. यालाही आता सहा-सात वर्षाचा अवधी झाला. हा कारखाना दत्त इंडिया या कंपनीने भाडेकराराने चालविण्यास घेतला आहे. यासाठी जिल्हा बँकेनेच पुढाकार घेतला होता. भाडेकराराची मुदत २०२७ पर्यंत आहे. . जसे गाळप होईल त्या प्रतिटनामागे कारखान्याचे भाडे जिल्हा बँकेत जमा करायचे असून त्यातून थकित कर्ज वसुली केली जात आहे. मात्र, कारखाना देत असताना मद्यार्क प्रकल्प स्वतंत्र ठेवण्यात आला. आतापर्यंत हा प्रकल्प चालविण्यास देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या, मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे या प्रकल्पाचा ताबा जिल्हा बँकेकडे आहे. मात्र, याच प्रकल्पातून स्वप्नपूर्ती शुगर कंपनीने मद्यार्क निर्मिती केली असा आक्षेप प्रदुषण नियंत्रण मंडळाचा असून या  प्रकल्पातून बाहेर पडणार्‍या रासायनिक पाण्याची नलिका फुटल्याने प्रदुषित पाणी थेट नदीत मिसळले, आणि त्याच्या प्रदुषणामुळे नदीतील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत झाले असा ढोबळ निष्कर्ष पाहणीत पुढे आला आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूरातील महाडिक-पाटील संघर्ष आता राजाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत

कृष्णा प्रदुषित झाली आहे हे मान्य, तिचे पावित्र्य अबाधित ठेवण्याची सर्वांचीच जबाबदारी आणि कर्तव्यही आहे. मात्र, यामध्ये राजकीय अभिनिवेश आढळून आला तर मूळ प्रश्‍न गेली तीन दशकाहून अधिक काळ गाजत असलेल्या शेरीनाल्याप्रमाणेच हाही प्रश्‍न भिजत पडलेल्या घोंगड्या प्रमाणे होणार आहे. सांगलीच्या राजकारणात एकेकाळी बापू-दादा असा सामना प्रत्येक ठिकाणी निवडणुकीत पाहण्यास मिळत होता. यातून चांदोली की ख्ाुजगाव धरणाचाही वाद राज्यपातळीवर गाजला. आज हाच वाद पुन्हा कृष्णा प्रदुषणाच्या निमित्ताने पुढे येतो की काय आणि या राजकीय प्रदुषणात कृष्णेचे प्रदुषण तिथेच राहते की काय अशी शंका येते. आता लोकसभा निवडणुका वर्षावर आल्या आहेत. गत निवडणुकीत सांगलीची काँग्रेसची जागा आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आली होती. मात्र, दादा घराण्यातून प्रतिसाद मिळाला नाही, यामुळे स्वाभिमानीच्या वाट्याला गेली. हातचे जाते की काय म्हणून विशाल पाटील ऐनवेळी मैदानात उतरले होते. त्यामुळे ते  स्वाभिमानीचे की काँग्रेसचे असा सवाल खुद्द आ. पाटील यांनीच एकवेळ केला होता. यानंतर काँग्रेसने त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देत  त्यांच्या काँग्रेस असण्यावर शिक्कामोर्तब करीत आ. पाटील यांना परस्पर उत्तर दिले. आता भाजप एकीकडे राज्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची तयारी करीत असताना महाविकास आघाडीचा चेहरा अद्याप समोर आलेला नाही, यातच आमदार पुत्र प्रतिक पाटील यांना राजकीय अवकाश आणि संधी हवी आहे यात या प्रदुषणाचे गणित मांडले जात तर नाही ना?

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics of sangli polluted vasantdada sugar factory alcohol project illegal print politics news ysh
First published on: 22-03-2023 at 13:39 IST