पुणे : शहराचे माजी महापौर आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांना बढती मिळाली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पक्षाने दिलेली जबबादारी स्वीकारल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेमध्ये विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत केंद्रीय नेत्यांचा राज्यातील प्रवास, त्यांच्या सभांचे नियोजन करण्यासाठी केंद्रीय नेता प्रवास समिती आहे. या समितीच्या पश्चिम महाराष्ट्रासाठीच्या सहसंयोजकपदाची जबबादारी काही दिवसांपूर्वी मोहोळ यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

हेही वाचा… पुणे शहर ३३ ठेकेदारांमुळे खड्ड्यात

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ पुण्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबरच अन्य पक्षातील नेत्यांबरोबरचे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबरोबरचे त्यांचे निकटचे संबंध, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच त्यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख असून करोना संसर्ग काळात महापौर म्हणून मोहोळ यांनी पार पाडलेली जबबादारी आणि शहराच्या प्रश्नांचा आवाका यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा भाजपमध्ये आहे. या नव्या जबाबदारीमुळे त्यांचा संपर्क आखणी वाढणार असून पक्षाच्या प्रदेश आणि केंद्रीय नेत्यांसमवेतची त्यांची जवळीक वाढणार असून त्याचा राजकीय फायदा मोहोळ यांना होईल, असे बोलले जात आहे.

हेही वाचा… पुणे : देशातील एकूण मॉलपैकी ८ टक्के जागा पुण्यातील मॉलमध्ये भाड्याने उपलब्ध ; नाईट फ्रँकच्या अहवालातील निष्कर्ष

दरम्यान, कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम सुरू केले. पक्षाने दिलेली जबाबदारी मी नेहमीच आनंदाने स्वीकराली आहे. नवी जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यालाही योग्य न्याय दिला जाईल, अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pune leader murlidhar mohol appointed as party state general secretary print pune nes asj