पुणे : आळंदी आणि देहू ते पंढरपूर महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी हवाई पाहणी केली. चौपदरीकरण झालेला हा मार्ग ‘हरित भक्ती मार्ग’ करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालखी विसाव्याच्या ठिकाणी किमान दहा हजार लोकांच्या सोयीचे सभागृह उभारण्यात येणार आहेत. एरवी लग्न कार्यासाठी आणि वारीच्या काळात वारकऱ्यांसाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. पालखी मार्गावर पेट्रोल पंप, फूड माॅल विकसित करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पालखी मार्गाच्या विकसनासंदर्भात तत्कालीन राज्य सरकारसमवेत बोलणे झाले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारशी बोलणे होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. खासदार रणजित निंबाळकर या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे उद्घाटन पुढील वर्षी; नितीन गडकरी यांची माहिती

गडकरी म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हडपसरपासून मोहोळपर्यंत असा २३४ किमी रस्ता विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण आणि दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सासवड, निरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर या ठिकाणी बाह्यवळण रस्ते प्रस्तावित केले आहेत. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा १३० किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस, बारामती, इंदापूर, अकलूज, बोंडले पर्यंत विकसित करण्यात येत आहे. दोन्ही मार्गांवरील पालखी विसाव्याच्या स्थळांवर वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी या सुविधांसह सौंदर्यीकरण केले जाणार आहे.

हेही वाचा >>> लांबलेल्या परीक्षा, विस्कळीत शैक्षणिक वर्षावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत गदारोळ

पालखी मार्गावर सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारची वनौषधे असतील. विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मधल्या भागात ५७ हजार २०० व दोन्ही बाजूस मिळून १८ हजार ८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

पाच टप्प्यांमध्ये विकसन

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाच टप्प्यांमध्ये पुढील वर्षीच्या जानेवारीपर्यंत विकसित होत आहे. मोहोळ ते वाखरी भागाचे ९१ टक्के, वाखरी ते खुडूस भागाचे ९७ टक्के, खुडूस ते धर्मपुरी भागाचे ८८ टक्के, धर्मपुरी ते लोणंद ४८ टक्के आणि लोणंद ते दिवे घाट भागाचे २० टक्के काम झाले आहे. दिवे घाट ते हडपसर भागाच्या विकसनाचा टप्पा अद्याप निविदा प्रक्रियेमध्ये आहे. एखादा टप्पा भूमी संपादनाच्या अभावी लांबू शकतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

पालखी मार्गावर रस्त्याच्या कडेला वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ३.२ मीटर मार्गावर लाल रंगाच्या ‘बीटूमन’ फरश्यांचा वापर केला जाईल. या फरशा डांबरी रस्त्याच्या तुलनेत फार गरम होत नाहीत. त्यामुळे वारकऱ्यांना पायी चालणे सुसह्य होईल.

नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूकमंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of alandi dehu pandharpur roads connecting by nitin gadkari pune print news vvk10 ysh