पुणे : शिरुर लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून कोण उमेदवार द्यायचा, याबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. पण शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शिरुर लोकसभा निवडणुक लढविणार अशी चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेच्या नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, “मागील अनेक वर्षांपासून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुर लोकसभा मतदारसंघात काम करणारे नेते आहेत. आम्ही सर्वांनी बरोबरीने काम केले आहे आणि करीत आहोत, पण त्यांनी काय निर्णय घेतला आहे. त्याबाबत जोपर्यंत स्पष्टपणे माहिती समोर येत नाही. तोपर्यंत याबाबात कोणतंही भाष्य करणं योग्य नाही. परंतु अचानकपणे घडलेली राजकीय युतीची समीकरणे एखाद्या व्यक्तीला असे निर्णय घेण्यास भाग पडू शकते. मात्र शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आप्तधर्म म्हणून निर्णय तो घेतला असेल तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांनी मिळूनच असे निर्णय घेतलेले असू शकतात.” तसेच शिवाजीराव आढळराव पाटील यांचं मतदार संघातील काम लक्षात घेता ते निश्चितच निवडून येतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आणखी वाचा- निवडणुकीनंतर गृहनिर्माण क्षेत्राला अच्छे दिन? २०१४ अन् २०१९ ची पुनरावृत्ती होणार का?

याशिवाय, बारामती लोकसभा मतदार संघातून विजय शिवतारे निवडणुक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार का? या प्रश्नावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “विजय शिवतारे हे माझे खूप वर्षांपासूनचे सहकारी आहेत. मी ज्यावेळी बारामती येथे रोजगार मेळाव्याला गेले होते. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये याबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करा, असे मी त्यांना सांगितले होते. सध्या त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्पष्टीकरण आणि मार्गदर्शनामुळे विजय शिवतारे यांचे नक्कीच समाधान होईल. पण प्रत्येकाने पक्ष शिस्त ही पाळलीच पाहिजे. अशी जाहीर विधान करणे योग्य होणार नाही. विजय शिवतारे यांच्यावर कारवाई होण्यापूर्वीच त्यांनी मध्यम मार्ग स्विकारला पाहिजे असा सल्ला त्यांनी विजय शिवतारे यांना दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neelam gorhe reaction on shivajirao adhalrao patil about to joined the ncp svk 88 mrj