पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर रिक्षाचालक प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. रिक्षाचालकांकडून सुरू असलेली ही लूट रोखावी, अशी तक्रार वारंवार रेल्वे प्रवाशांकडून केली जात होती. अखेर प्रवाशांची फसवणूक होऊ नये, यासाठी रेल्वे स्थानकावरील प्रीपेड बूथ लवकच सुरू केले जाणार आहे.
प्रीपेड बूथ करोना संकटाच्या काळात सुरू होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ते बंद झाले. प्रीपेड बूथ बंद झाल्यानंतर काही रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारण्यास सुरूवात केली. याबाबत प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. अखेर प्रीपेड बूथ पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने मांडला. यासाठी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.मिलिंद हिरवे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजित डोंगलजाळ आणि रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली.
हेही वाचा >>>प्रवास यातना! गळक्या गाड्या, झुरळे अन् अस्वच्छतेने रेल्वे प्रवासी हैराण
या बैठकीत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी प्रीपेड बूथ सुरू करण्याची भूमिका मांडली. रिक्षा संघटनांनी याला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात रेल्वे, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि रिक्षा संघटनांच्या पाच प्रतिनिधींचा समावेश आहे. या समितीची पुढील बैठक लवकरच होणार असून, त्यात प्रीपेड बूथबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण
प्रीपेड ऑटो रिक्षा बूथ सुरू करण्यासाठी पुणे रेल्वे विभाग उत्सुक आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे स्थानकावर प्रीपेड ऑटो रिक्षा बूथ लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.