Premium

राष्ट्रवादीमधील दोन गटांना एकत्र आणण्यासाठी अजित पवारांना हात देणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांकडून शरद पवार गट आणि अजित पवार गटाने पुन्हा एकत्र यावा असे बॅनर लावत अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली.

katraj doodh sangh chief bhagwan pasalkar avoided naming sharad pawar supriya sule praise ajit pawar
शरद पवार, अजित पवार, व सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीतही पक्ष, पक्षचिन्ह कुणाचं यावरून वाद निर्माण झाला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर यावर सुनावणी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांकडून शरद पवार गट आणि अजित पवार गटाने पुन्हा एकत्र यावा असे बॅनर लावत अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्या मनाला वाटतं की, आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. कारण महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा विकास हे आहे. या दिल्लीतील अदृश्य हाताला महाराष्ट्राचं काहीही पडलेलं नाही. त्यांना फक्त त्यांचंच भलं होणं यातच रस आहे. नवीन सरकार सत्तेत येऊन दीड वर्ष झालं. या सव्वा वर्षात या सरकारने जनतेचं भलं करणारी, आयुष्यात मोठा बदल झाला अशी महाराष्ट्रात कोणती मोठी गोष्ट केली आहे?

“मी सत्तेत असते, तर महाराष्ट्रात मेट्रो आणली नसती”

“हे सरकार मेट्रो मेट्रो म्हणत राहते. माझा मेट्रोला विरोध नाही. मात्र, मी सत्तेत असते, तर मी महाराष्ट्रात मेट्रो आणली नसती. मी आधी महाराष्ट्राची एसटी नीट केली असती. महिलांना बसमध्ये मोफत प्रवासाची घोषणा करण्यात आली. मात्र, माझ्या मतदारसंघातील महिला सांगतात की, पास तर दिला, पण एसटी बसच येत नाही. त्या पासचा उपयोग काय?” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

हेही वाचा : “सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

“सर्व शासकीय रुग्णालये व्यवस्थित केली पाहिजेत”

“यांनी आधी राज्य परिवहन महामंडळासह सर्व शहरांच्या बस महामंडळांना पैसे दिले पाहिजेत. सर्व शासकीय रुग्णालये व्यवस्थित केली पाहिजेत. त्यांनी सर्व सरकारी शाळा सुधारायला हव्यात. यात सरकारने निधी टाकला पाहिजे,” असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं.

“हे पालकमंत्रिपदासाठी खासगी विमानाने दिल्लीला”

सुप्रिया सुळेंनी पालकमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या दिल्ली दौऱ्यांवरही टीका केली. त्या म्हणाल्या, “नांदेडला ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. पालकमंत्रिपदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या विमानाने दिल्लीला गेले, ते विमान नांदेडला जाऊ शकत नव्हता का? ते दिल्लीला एसटीने गेले नाहीत, तर खासगी विमानाने गेले. हे पालकमंत्रिपदासाठी खासगी विमानाने दिल्लीला जाऊ शकतात, तर मग ४१ मृत्यू झालेल्या नांदेडमध्ये जाता येत नाही का?”

“मोडेल, पण दिल्ली दरबारासमोर वाकणार नाही”

“४१ मृतांमध्ये १२ लहानलहान तान्ही मुलं आहेत. कधी त्या आईच्या दुःखाचा विचार केला आहे का? हे इतकं असंवेदनशील सरकार आहे. अशा सरकारबरोबर आम्ही काम करणार नाही. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी मोजू. मोडेल, पण दिल्ली दरबारासमोर वाकणार नाही,” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule comment on demand of reunite of sharad pawar ajit pawar faction of ncp pbs

First published on: 07-10-2023 at 12:32 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा